पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असणार आहेत. प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वाधिक लाेकसंख्येचा, तर प्रभाग क्रमांक पाच हा सर्वात कमी लाेकसंख्येचा आहे. या प्रभाग रचनेवर चार सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहेत.

महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट आहे. आयुक्त हे प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. महापालिकेची निवडणूक २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. सन २०११ च्या १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्येप्रमाणेच प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. तळवडे-चिखली भागातून प्रभाग रचना सुरू करून सांगवी-दापाेडी अशा उतरत्या क्रमाने करण्यात आली आहे.

प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग नकाशे बनविण्यात आले. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार घेण्यात आला आहे. आवश्यतेनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करण्यात आली. महापलिकेने पाच ऑगस्ट रोजी राज्याच्या नगरविकास विभागाला प्रभाग रचना सादर केली. नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविली. आयोगाने मान्यता दिल्यानंतर प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. महापालिका मुख्यालयाच्या आवारात ३२ प्रभागाचे ३२ नकाशे लावण्यात आले. फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना आहे.

हरकतींसाठी १४ दिवसांची मुदत

प्रभाग रचनेवर चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पाच ते १२ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान सुधारणांसह अंतिम प्रारूप रचना नगर विकास विभागाला सादर केली जाणार आहे. तीन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मंजुरी दिल्यानंतर महापालिका आयुक्त अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणार आहे.

शहरात १७ लाख ७५१ मतदार

२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लाेकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. महापालिका निवडणुकीसाठी एक जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात १७ लाख ७५१ मतदार आहेत. मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आल्या आहेत. मतदार याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या प्रभागनिहाय फोडल्या जातील, असे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

प्रभागांचे आरक्षण

महिला आणि पुरुष प्रत्येकी ६४, अनुसूचित जातीसाठी (एससी) २०, अनुसूचित जमाती (एसटी) तीन, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) ३५ आणि सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी ७० जागा राखीव असणार आहेत.

प्रभाग नऊ सर्वाधिक लाेकसंख्येचा

महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात किमान ४९ ते कमाल ५९ हजार लाेकसंख्येचा असणार आहे. मासुळकर काॅलनी, खराळवाडी येथील प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वाधिक ५९ हजार ३९० लोकसंख्येचा, तर सर्वात कमी लाेकसंख्येचा प्रभाग क्रमांक पाच गवळीनगर, चक्रपाणी वसाहत ४९ हजार ४९ लाेकसंख्येचा आहे.

राज्य निवडणूक आयाेगाच्या मान्यतेनुसार महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालय आणि संकेतस्थळावर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक असणार आहेत. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.