पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळेगुरव येथील सृष्टी चौक ते शंकरवाडी पर्यंत २३ कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे समोर आले आहे.
पिंपळेगुरव मार्गे कासारवाडी आणि पुढे शंकरवाडी मार्गे पुणे – मुंबई महामार्गावर वेगाने जाता यावे, यासाठी शंकर मंदिर ते पिंपळेगुरव येथील सृष्टी चौकापर्यंत सिमेंट काँक्रिटचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यात आला. या रस्त्यावरील शंकर मंदिर ते कासारवाडीच्या भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याला भेगा पडल्या आहेत.
सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांतच शंकरवाडी येथील घनकचरा स्थानांतर केंद्रासमोर रस्त्याला दोन इंचाची दहा मीटर लांब भेग पडली. दोन्ही बाजूंनी रस्ता बंद करुन दुरुस्तीचे काम करण्यात आले. याला महिनाभराचा कालावधी उलटला नाही. तोच पुन्हा याच ठिकाणी एक ते दीड इंचाची दहा ते पंधरा मीटर लांब भेग पडली आहे. ती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा रस्ता उखडण्यात आला. रस्त्यावर सुरक्षा कठडे उभारून भेग पडलेला रस्ता सिमेंट काँक्रिट भरुन दुरुस्त करण्यात आला.
‘सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला भेगा पडल्या होत्या. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा देखभाल दुरुस्ती कालावधी पाच वर्षाचा आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करुन देणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. त्यानुसार रस्त्याची दुरुस्ती करुन घेण्यात आली’ असल्याचे उपअभियंता सुनील दांगडे यांनी सांगितले.