पिंपरी : अचानक उद्भवणारी आपत्ती, अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती, जुन्या धोकादायक इमारतींचे कोसळणे, रस्त्यावरील अपघात आदींबाबत अद्ययावत तांत्रिक माहिती, ज्ञान आणि प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातील २२० अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. बचाव संबंधित दहा प्रकारचे विशिष्ट प्रशिक्षण असणार आहे.
ड्रोनच्या सहाय्याने हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासह आधुनिक उपकरण हाताळण्या बाबतचे प्रात्यक्षिके करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक व कृत्रीम आपत्तीचा सामना करण्यासाठी अग्निशामक दलाने आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत अग्निशमन विभागातील पूर्वीपासून कार्यरत असलेले ७० अनुभवी आणि १५० नव्याने नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन विभागाने दहा विशिष्ट प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केले आहेत. हे अभ्यासक्रम संबंधित कर्मचाऱ्यांच्या वयोगट, जबाबदाऱ्या आणि शारीरिक क्षमतांचा विचार करून तयार करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम १८ ते ५५ वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असून, त्यांचे आधुनिक तांत्रिक कौशल्य विकसित करणे हा मुख्य उद्देश आहे.
अग्निशमन जवानांना आधुनिक आव्हानांसोबतच झाड कापण्यासाठी कटरचा योग्य वापर, पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य, ड्रोनच्या सहाय्याने हरवलेल्या व्यक्तींचा शोध, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीस सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे, मानसिक तयारी, सामूहिक कार्यशैली आणि आधुनिक उपकरण हाताळणे बाबतचे प्रात्यक्षिके करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. तसेच यात प्राथमिक उपचार, जलदुर्घटना व बोट बचाव, उपकरणांची काळजी व देखभाल, उंचीवरील व मर्यादित जागेतील बचाव पद्धती, खोल पाण्यातील डायव्हिंग, ड्रोन हॅन्डलिंग ऑपरेशन आणि के नऊ डॉग हँडलिंग अशा विविध कौशल्यांचा समावेश असल्याचे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.
पूर्वीचा अनुभव आणि नव्या तंत्रज्ञानाचा योग्य मेळ जमवणे आजच्या काळाची गरज आहे. या प्रशिक्षणांमुळे कर्मचारी केवळ नव्या उपकरणांच्या वापराबरोबरच आपत्ती व्यवस्थापनात प्रभावी भूमिका पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहर वाढते तशा आपत्तीच्या शक्यता आणि स्वरूपही बदलत आहेत. त्यामुळे अग्निशमन जवानांनी केवळ आग विझवण्यात नव्हे, तर कोणत्याही आपत्तीच्या वेळी तत्पर, प्रभावी आणि विश्वासार्ह प्रतिसाद देण्यास सक्षम असायला हवे. हे प्रशिक्षण त्यांचे धैर्य, कौशल्य आणि तयारी यामध्ये एक पाऊल पुढे नेणारे आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. तर, अग्निशमन दल केवळ तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा न राहता, ही एक तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज आणि प्रशिक्षित टीम असावी लागते. या प्रशिक्षण उपक्रमामुळे जवानांचा शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि तांत्रिक आत्मविश्वासही बळकट होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी व्यक्त केला.