पिंपरी : सेवानिवृत्तीच्या दिवशी मशिन खरेदीचा आदेश दिल्याप्रकरणी महापालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निवृत्तीवेतनातील दहा टक्के रक्कम पुढील पाच वर्षांसाठी कपात करण्याचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासाठी हायपर बोलिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) मशिन खरेदीच्या निविदा प्रक्रियेला डॉ. अय्यर यांनी स्वत:च्या अधिकारात मान्यता दिली. या प्रकरणी डॉ. अय्यर यांची ८ सप्टेंबर २०१५ रोजी विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशी अधिकारी डॉ. एस.बी.पानसे यांनी २६ मे २०१७ रोजी आयुक्तांना अहवाल सादर केला होता.
हेही वाचा >>>पुणे: दहावीची बनावट प्रमाणपत्रे देणारी टोळी गजाआड
शासन आणि महापालिका स्तरावर उल्लेखनीय कामाबाबत वेळोवेळी प्रशस्तिपत्रके दिली आहेत. त्यामुळे दोषमुक्त करावे, अशी विनंती डॉ. अय्यर यांनी केली होती. मात्र, प्रशासनाने विनंती नाकारली.वैद्यकीय विभागप्रमुखांनी योग्य ती कारवाई करण्याची शिफारस केली होती. अधिकारी, कर्मचारी सेवेच्या कालावधीत गंभीर गैरवर्तणुकीबद्दल अपराधी असल्याचे चौकशीत आढळल्यास कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार डॉ. अय्यर यांच्या निवृत्ती वेतनातील दहा टक्के रक्कम पुढील पाच वर्षांसाठी कपात करण्यात येणार आहे.