पुणे ः भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला उत्साहाने सुरुवात झाली. प्रेक्षकांनीदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळपासूनच प्रेक्षक गॅलरी भरायला सुरुवात झाली होती. मात्र, या सर्व प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते.

सामन्याला सुरुवात झाल्यापासून तासाभरातच हे चित्र दिसू लागले. हळूहळू प्रेक्षकांनी आवाज चढवायला सुरुवात केली. सामन्याच्या ठिकाणी पाणी मोफत दिले जाणार असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. पाण्याची मोफत सुविधा केलीदेखील होती. पण, सुरुवातीचे पाणी संपल्यावर प्रेक्षकांना पाणी विकत घ्यावे लागले होते.

हेही वाचा >>>Pune Water Tank Collapse : पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून तीन कामगारांचा मृत्यू; ७ गंभीर जखमी

दरम्यान, पाणी मिळत नसल्याने चिडलेल्या प्रेक्षकांच्या रोषाला पोलिसांनाही सामोरे जावे लागत होते. अशा वेळी पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. कुठेच पाणी नसल्याचे प्रसार माध्यमाच्या कक्षाजवळ येऊन त्यांनी सांगितले, तेव्हा तेथील पाण्याच्या बाटल्या प्रेक्षकांमध्ये वाटण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, गर्दीच्या तुलनेत ते पाणी कमी पडत होते. या सगळ्या गर्दीत दोन दृष्टिहीन मुले अडकली होती. त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पाणी देऊन गर्दीतून बाहेर काढले.

हेही वाचा >>>पिंपरी: विनापरवाना फटाका स्टॉलवर महापालिकेची नजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बऱ्याच वेळानंतर स्टेडियमची व्यवस्था पाहणारे एमसीएचे एक सदस्य सुशील शेवाळे यांच्याशी संपर्क झाला असता, त्यांनी, ‘पाण्याची सुविधा विश्वचषक स्पर्धेप्रमाणे केली होती. पण, पाणी संपले आणि त्यात पाणी घेऊन येणाऱ्या वाहनाचे चाक पंक्चर झाल्यामुळे पाणी पोहोचू शकले नाही,’ असे सांगितले. या दरम्यान स्टेडियमवर खाण्याचे स्टॉल टाकलेल्या स्टॉलधारकांनी पाण्याची विक्री करण्यास सुरुवात केली. एका ग्लासास १० रुपये आणि एक लिटर पाण्यास ६० रुपये या दराने त्यांनी पाण्याची विक्री करण्यास सुरुवात केली.