पुणे : ‘मुघलकालीन ऐतिहासिक कागदपत्रे फारसी भाषेत आहेत. फारसी भाषेत इतकी कागदपत्रे आहेत, की त्यामुळे इतिहासाच्या आकलनासाठी फारसी कागदपत्रांचे संशोधन गरजेचे आहे. त्यासाठी संशोधक घडवावे लागतील,’ असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘आपल्याकडे इतिहासात राजकारण आले आणि राजकारणात इतिहास आला. औरंगजेबाकडे पाहून निष्कर्ष काढू नका. फारसी ही फार गोड भाषा आहे,’ अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी या वेळी केली.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राजेंद्र जोशी आणि संगीता महाजनलिखित ‘रीडिंग कोर्ट न्यूजलेटर ऑफ औरंगजेब’ या पुस्तकाचे प्रकाशन मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि प्रदीप आपटे या वेळी उपस्थित होते.

मेहेंदळे म्हणाले, ‘इतिहासाच्या अभ्यासासाठी मी फारसी शिकलो. पण, जोशी हे मूळ फारसी भाषेचे अभ्यासक आहेत. त्यामुळे ते फारसीकडून इतिहासाच्या अभ्यासाकडे आले. भारत इतिहास संशोधक मंडळाने घेतलेल्या फारसी प्रशिक्षण वर्गामुळे पुण्यात डझनभर अभ्यासक फारसी वाचू शकतात. हे जोशी यांच्या प्रशिक्षणामुळे शक्य झाले. कागदपत्रे प्रकाशित करण्याची सुरुवात इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी सुरू करून अभ्यासकांवर मोठे उपकार केले आहेत.’

‘मूळ साधनांकडे गेल्याशिवाय इतिहास समजणार नाही. अभ्यासकांना स्रोत निर्माण करून देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. पायाभूत सुविधांची पूर्तता करताना साधनांची उपलब्धता करून देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना मोडी लिपी अवगत नसल्याने इतिहासाची मूळ साधने वाचण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही,’ असे रावत म्हणाले.

जोशी म्हणाले, ‘लंडन येथे उपलब्ध औरंगजेबाच्या राजवटीतील कागदपत्रांवर आधारित हे पुस्तक आहे. या पुस्तकातून त्याचा दिनक्रम, दरबारातील निर्णयांचे अखबार, मनसबदार नेमणुका या विषयी माहिती मिळते.’ आपटे यांनी प्रास्ताविक केले. केदार फाळके यांनी सूत्रसंचालन केले. पटवर्धन यांनी आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंटरनेटवर अखबार उपलब्ध

‘फारसी भाषेतील मुघलकालीन तीन हजार कागदपत्रे (ज्याला अखबार असे म्हटले जाते) लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीकडे आणि तितकीच बिकानेर येथे आहेत. औरंगजेबाने १८ हजार दिवस राज्य केले. या अखबारामधील पाच हजार औरंगजेबाच्या राजवटीतील आणि ढोबळमानाने एक हजार अखबार हे उत्तरकालीन मुघल कारभाराचे असावेत. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या देणगीतून मिळविण्यात आलेले सर्व अखबार इंटरनेटवर मोफत ठेवण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून निसटले, त्या दिवशीचा अखबार आणि औरंगजेबाने पंढरपूरचे देऊळ पाडले त्या दिवशीचा अखबारही त्यामध्ये आहे,’ असे गजानन मेहेंदळे नमूद केले.