फुरसुंगी येथील कचरा डेपोची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अचानक धूर दिसल्यामुळे उघडकीस आलेल्या दारूभट्टीवर पोलिसांनी वर्षभरात तब्बल ३२ वेळा कारवाई केली आहे, अशी माहिती खुद्द पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनीच सोमवारी दिली. दर महिन्याला जवळजवळ तीन वेळा कारवाई करूनही ही दारूभट्टी सुरू कशी राहिली, असा नवाच प्रश्न आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे उपस्थित झाला आहे.
नागपूर अधिवेशनामध्ये फुरसुंगी येथील हांजर कचरा विघटन प्रकल्पाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे अजितदादा शहरातील सर्व आमदार, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन सकाळी या कचरा प्रकल्पाची पाहणीसाठी गेले. या ठिकाणी पाहणी करत असताना दादांना प्रकल्पापासून काही अंतरावर धूर निघताना दिसल्यामुळे या ठिकाणी सुरू असलेली हातभट्टी उघडकीस आली होती. त्यानंतर दादांनी भडकून ‘आता हातभट्टी डेपो बंद करण्याचे काम अजित पवार आणि आर.आर. पाटील यांनी करायचे काय?’ असेही पोलिसांना सुनावले होते. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना थेट फोन लावून तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत जेसीबी लावून हातभट्टीचे डेपो उखडून टाकले. हातभट्टी चालविणाऱ्या विशाल कॅम्प परदेशी (रा. हडपसर) याला अटक केली होती.
दारूभट्टी प्रकरणी कोणावर कारवाई केली आहे, अशी विचारणा पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना केली असता ते म्हणाले की, ‘‘या ठिकाणी सुरू असलेल्या दारूच्या हातभट्टीवर गेल्या वर्षभरात ३२ वेळा कारवाई करण्यात आली आहे. दारूची भट्टी चालविणाऱ्यांच्या विरुद्ध मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ९३ नुसार कारवाई केली आहे. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.’’
फुरसुंगी कचरा डेपोला अजितदादा भेट देणार असल्यामुळे येथील डेपोजवळील स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे हातभट्टी चालविणाऱ्यास या ठिकाणी मंत्री येणार असल्याची माहिती असतानाही त्याने दारूची भट्टी सुरूच ठेवली. प्रत्यक्ष कचरा डेपोकडे अनेक लाल आणि पिवळ्या दिव्याच्या मोटारी आल्या तरी येथील आरोपी दारूची भट्टी पेटवत होते.. बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्यांना पोलिसांचा आणि यंत्रणांचा किती धाक राहिला आहे, याचेही दर्शन या निमित्ताने घडले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2013 रोजी प्रकाशित
वर्षांत ३२ वेळा कारवाई केली तरीही..
दर महिन्याला जवळजवळ तीन वेळा कारवाई करूनही ही दारूभट्टी सुरू कशी राहिली, असा नवाच प्रश्न आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे उपस्थित झाला आहे.

First published on: 31-12-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phursungi garbage depot liquor action ajit pawar