पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांना देणार आहे. ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विकास योजना आणि गेल्या ११ वर्षांतील चार कोटी लोकांना पक्की घरे, ‘हर घर जल’ योजना, आयुष्मान भारत योजना यांसारख्या योजनांच्या कामगिरीची आणि सरकारच्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविणार आहे.

भाजपची पिंपळे सौदागर येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ पार पडली. प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराच्या प्रभारी वर्षा डहाळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी महापौर उषा ढोरे, नितीन काळजे, राहुल जाधव, सरचिटणीस विलास मडेगिरी यावेळी उपस्थित होते.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने देशभरात संकल्प ते सिद्धी अभियान सुरू केले आहे. हे अभियान पिंपरी-चिंचवड शहरात सक्षमपणे राबवावे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विकास योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. योजनांचे महत्त्व पटवून द्यावे. लोकांना लाभ मिळवून द्यावा,’ अशा सूचना पांडे यांनी दिल्या.

काटे म्हणाले, ‘संकल्प ते सिद्धी अभियानांतर्गत जिल्हास्तरावर प्रदर्शने, संवाद सत्रे आणि कार्यशाळा घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त, १६, १७ आणि १८ जून दरम्यान विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर १७ ते २० जून दरम्यान योग सत्रांचे आयोजन केले आहे’.

लांडगे म्हणाले, ‘सबका साथ, सबका विकास’ या सरकारच्या ध्येयानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजाविणे आवश्यक आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमांद्वारे लोकांना सरकारच्या कामगिरीबद्दल माहिती देऊन त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.