पिंपरी : प्लॉटिंगबाबत राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे (एनजीटी) दिलेली तक्रार मागे घ्या, असे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. तसेच, अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती आणि भाजपच्या माजी प्रभाग स्वीकृत सदस्यासह अकरा जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली.

भाजपचे माजी प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश लालचंद यादव, भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांचा पती संतोष तात्या जाधव यांच्यासह निलेश लालचंद यादव, गणेश किसन यादव, दिपक घन, गणेश नंदू मोरे, सोमनाथ यादव, स्वराज पिंजण, प्रकाश चौधरी, मनोज मोरे, कुंदन गुप्ता (सर्व रा. चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रमेश मोहिते, (वय ३०, रा. गणेशसिद्धी सोसायटी, नेवाळे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना

हेही वाचा – पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल

मोहिते हे माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत. ते कामानिमित्त चिखली येथे थांबले असताना आरोपी त्याठिकाणी आले. चिखली येथील प्लॉटिंगबाबत एनजीटीकडे दिलेली तक्रार मागे घ्या. तेथे राहणारे लोक माझ्याकडे आले होते. हे लोक माझे आहेत, असे सांगितले. फिर्यादी व त्यांचे मित्र गोपाळ यांनी त्यांना आमचा व तुमचा काही संबध नाही. आम्ही न्यायालयात त्याबाबत उत्तर देवू, असे सांगितले. त्यामुळे आरोपींनी आपापसात संगनमत करून काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये मोहिते जखमी झाले असून त्यांचा दात तुटला. त्यानंतर आरोपींनी मोहिते यांचे मोटारीत बसवून अपहरण केले. पुन्हा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जाधववाडी येथे सोडून दिले. सहायक निरीक्षक राम गोमारे तपास करीत आहेत.