पुणे : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून एक लाखांची लाच घेणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मुगुटलाल पाटील यांची याप्रकरणात एसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

ओंकार भरत जाधव (वय ३१, रा. वास्तुव्हिवा सोसायटी, वाकड, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ओंकार जाधव मोटारचालक आहे. जाधव आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांची पूर्वीपासून ओळख होती. तक्रारदार तरुणाविरुद्ध सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज आला होता. कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावरील जागेसंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रार अर्जात म्हटले होते. संबंधित तक्रार अर्जाची चौकशी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

हेही वाचा…Shiv Jayanti 2024 ‘शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध,’ मुख्यमंत्र्यांचे शिवनेरी येथील सोहळ्यात उद्गार

तक्रार अर्जानुसार तक्रारदार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल न करणे, तसेच त्याला गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी मुगुटलाल पाटील यांच्या सूचनेवरून ओंकार जाधव याने केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. बंडगार्डन रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयाच्या आवारात लाचेचा पहिला हप्ता स्विकारणाऱ्या जाधवला सापळा लावून पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा…पुणे विमानतळासाठी तारीख पे तारीख! पंतप्रधानांना वेळ नसल्याने नवीन टर्मिनलचे ‘उड्डाण’ होईना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी जाधवने सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल भोसले यांच्या सांगण्यावरुन लाच मागितल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. तपास पूर्ण झाल्यावर संबंधित सहायक पोलिस आयुक्तांना आरोपी करायचे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी सांगितले.