पिंपरी : टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी सायंकाळी उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या गजराने अवघी उद्योगनगरी दुमदुमून गेली होती. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात भाविकांचा अभूतपूर्व असा उत्साह दिसून आला. आमदार महेश लांडगे यांनी पालखीचे सारथ्य केले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहूतीलच इनामदारवाड्यात झाला. गुरुवारी सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. अनगडशाह बाबा यांच्या दर्ग्याजवळ आणि चिंचोली पादुका येथे अभंग, आरती झाली. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली.
पालखी सोहळ्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील अनेक भाविक तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी, तसेच दर्शनासाठी आले होते. सर्व रस्ते वारकरी-भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात गुरुवारी पालखी मुक्कामी आहे. शुक्रवारी पहाटे पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पालखीचे स्वागत करण्यात आले.
पालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांना देशी झाडांच्या बिया, वैद्यकीय प्रथमोपचार पेटी, कापडी पिशव्या आणि संपर्क माहितीपुस्तिकेचे वाटप करण्यात आले. पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार केला. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त सचिन पवार या वेळी उपस्थित होते.