पिंपरी : बोपखेल येथे एका तरुणाचा खून करून पळून गेलेल्या आरोपींना दिघी पोलिसांनी अटक केली. खून केल्यानंतर आरोपी डोंगरावर लपून बसले होते. त्यांचा डोंगर परिसरात शोध घेत पोलिसांनी अटक केली.
रोहन अरुण गायकवाड (२१, बोपखेल), माम्या ऊर्फ प्रतिक दौलत मोहोल (२७, बोपखेल. मूळ रा. अमरावती) यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या १५ वर्षीय साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विकास राजेश खरे (२४, रा. बोपखेल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नीरज राजेश खरे (२७) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपखेलमधील गणेशनगर येथे १६ जून रोजी सायंकाळी तिघांनी विकासचा धारदार हत्याराने वार करीत खून केला. या गुन्ह्यातील आरोपी दिघी येथील डोंगरावर लपून बसल्याची माहिती पोलीस अंमलदार सुधीर डोळस यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार केली. दिघी येथील डोंगराला वेढा घातला आणि आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस आपल्या मागावर आहेत, हे समजताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करून लागले. मात्र, पोलिसांनी डोंगराला सर्व बाजूंनी घेरले होते. दोघांना अटक करत त्यांच्या १५ वर्षीय साथीदाराला ताब्यात घेतले आहे.