पिंपरी : पत्नीला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाला आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आल्याची घटना निगडीत घडली.

याबाबत पुण्यातील २७ वर्षीय तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या पत्नीला वारंवार फोन करून त्रास देत होता. याबाबत फिर्यादींनी पत्नीला ‘फोन का करतोस’ असे विचारले असता, त्याने फिर्यादीस निगडी येथे बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

ब्लेडने गळ्यावर वार

म्हाळुंगे गावात एका व्यक्तीला घराजवळील शौचालयात घेऊन जाऊन त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. शशिचंद्र रामदयालसिंह वर्मा (४०) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी रणजित उत्तमसिंह कुमार (३०, महाळुंगे, खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंशू भोला (२०, म्हाळुंगे, खेड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते शशिचंद्र यांना आरोपी अंशू हा शौचालयाजवळ घेऊन गेला. शशिचंद्र दगडावर झोपलेले असताना आरोपी अंशू याने त्यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यांना गंभीर जखमी केले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

उसने पैसे परत मागितल्याने तरुणाला मारहाण

उसने दिलेले पैसे परत मागितल्यामुळे दोन आरोपींनी एका तरुणाला फरशी, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना निघोजे येथे घडली. या प्रकरणी योगेश बळीराम चव्हाण (२३, निघोजे, खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण रमाकांत साकेत (२०, डोंगरवस्ती, निघोजे) आणि शुभम संजय चव्हाण (१९, डोंगरवस्ती, निघोजे) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना आरोपीने त्यांना फोन केला. त्यावेळी योगेश यांनी आरोपी आरोपींना दिलेले उसने पैसे परत मागितले. या कारणावरून आरोपी शुभमने फरशीने फिर्यादीच्या डोक्यात मारले, तर आरोपी करणने ‘तू सतत आम्हा दोघांना पैसे का मागतो’ असे म्हणून ‘तुला आज आम्ही जिवंत ठेवत नाही, मारून टाकतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर करणने तेथे पडलेला दगड दोन्ही हातांनी उचलून फिर्यादीच्या दोन्ही गुडघ्यांवर आणि खांद्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

पत्नीची डॉक्टर पतीला मारहाण

पतीला भेटण्यासाठी बोलावून घेत पत्नी आणि तिच्या मित्राने शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना वराळे, मावळ येथे घडली. या प्रकरणात डॉक्टर पतीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी, तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या पत्नीने वराळेत बोलावले. त्यामुळे ते तिथे गेले. त्यावेळी पत्नीने फिर्यादींशी भांडण करून मित्राला बोलावून घेतले. तिच्या मित्राने फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, फिर्यादींच्या पत्नीनेही फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

तंबाखू न दिल्याने हॉटेल मालकासह वेटरकडून ग्राहकाला मारहाण

तंबाखू न दिल्यामुळे एका हॉटेलमधील वेटरने ग्राहकाशी वाद घालून, हॉटेल मालकासोबत संगनमत करून ग्राहकाला व त्याच्या भावाला फायबरच्या काठीने आणि हाताने मारहाण केल्याची घटना बिरदवडी, खेड येथे घडली. या प्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल मालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ हे दोघे एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली असताना वेटर त्यांच्याजवळ आला आणि त्याने फिर्यादीकडे तंबाखू मागितली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी हॉटेल मालक कॅश काउंटरवरून हातात फायबरची काठी घेऊन फिर्यादीजवळ आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून फायबरच्या काठीने त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मारून जखमी केले. फिर्यादीचा भाऊ भांडणे सोडवण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला हाताने मारहाण करून ‘येथून जाता की नाहीतर तुम्हाला खल्लास करतो’ अशी धमकी दिली. चाकण पोलीस तपास करत आहेत.

रूम खाली करण्याच्या वादातून नणंदेला मारहाण

रूम खाली करण्यावरून झालेल्या वादातून भावजयीने नणंदेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घोटावडे फाटा, मुळशी येथे घडली. या प्रकरणी नणंदेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेच्या भावाच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांची भावजय आरोपी हिला तिची रूम खाली करण्यास सांगण्यासाठी गेली होती.

त्यावेळी आरोपी भावजयीने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तिने घराशेजारी पडलेले लाकडी दांडके घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारले आणि तिला जखमी केले. मारहाण केल्यानंतर तिने फिर्यादीला ‘लोणावळ्यावरून मी मुले आणते आणि तुझ्याकडे बघूनच घेते, तुझ्या कुटुंबाला आता सोडतच नाही’ अशी धमकी दिली. बावधन पोलीस तपास करत आहेत.