पिंपरी : रस्त्यात उभा केलेला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितल्याने चालकाने महिला वाहतूक पोलिसाला मारहाण केली. ही घटना सोमवारी शगुन चौकाजवळ पिंपरी येथे घडली. शरद अशोक कांबळे (२५, मांजरी खुर्द, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई जयश्री जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयश्री जाधव या पिंपरी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. सोमवारी दुपारी त्यांना शगुन चौक पिंपरी येथे वाहतूक नियमन करण्याचे काम देण्यात आले होते. वाहतुकीचे नियमन करत असताना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी शरद टेम्पो घेऊन शगुन चौकातून साई चौकाकडे जात होता. त्याने टेम्पो रस्त्यावर उभा केला. टेम्पो रस्त्यात थांबल्याने वाहतुकीस अडथळा होऊ लागला. त्यामुळे महिला पोलीस जाधव यांनी टेम्पोचालकाला टेम्पो पुढे घेण्यास सांगितले. त्या कारणावरून त्याने जाधव यांना शिविगाळ करून त्यांच्या अंगावर धावून येत त्यांना मारहाण केली. पोलिसांनी शरद कांबळे याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी
पुणे नाशिक महामार्गाने जाणाऱ्या एका दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील महिला गंभीर जखमी झाली. दीपांजली सौरव सोनटक्के असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पतीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी दीपांजली हे सांगवी येथून मोशी येथे दुचाकीवरून जात होते. पुणे नाशिक महामार्गाने जात असताना मोशी येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दीपांजली रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला, हाताला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर आरोपी दुचाकी चालक पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
ट्रेलरची दुचाकीला धडक, पाच वर्षीय मुलाचा मृत्यू
ट्रेलरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील पाच वर्षीय मुलगा ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दुचाकी वरील महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात अलंकापुरम रोड दिघी येथे घडला.
शिवांश नितीन रासकर (पाच) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. जयश्री संदीप पाटील (३५) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रेलर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाची पत्नी, त्यांची मैत्रीण आणि पाच वर्षीय पुतण्या शिवांश असे तिघेजण दुचाकीवरून वडमुखवाडी अलंकापुरम रोडने चिंचवड येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला एका ट्रेलरने डाव्या बाजूने धडक दिली. या अपघातात शिवांश हा ट्रेलरच्या चाकाखाली चिरडला गेला. त्यात त्याचा मृत्यू झाला. जयश्री पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. दिघी पोलीस तपास करत आहेत.
काम करण्यास नकार दिल्याने पेंटरला मारहाण
एका पेंटरने काम करण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना मुळशी तालुक्यातील नेरे येथे घडली. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी यांना पेंटिंगचे काम सांगितले होते. ते काम करण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी यांना नेरे गावात बोलावून घेतले. तिथे त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
रिक्षा भाड्याचे पैसे घेण्यावरून एकावर खुनी हल्ला
रिक्षाच्या भाड्याचे पैसे घेण्याच्या कारणावरून तरुणाने एका व्यक्तीवर खुनी हल्ला केला. ही घटना खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे घडली. नसीम मोहम्मद कलाम शाह (४२) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम सखाराम पवार (२४, खेड) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा नसीम शाह यांचे वाकी येथे पंक्चरचे दुकान आहे. रविवारी दुपारी ते त्यांच्या दुकानामध्ये झोपले होते. त्यावेळी शुभम पवार तिथे आला. त्याने नसीम यांच्या डोक्यात शस्त्राने मारून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शुभम पवार याला अटक केली आहे. रिक्षाच्या भाड्याचे पैसे देण्याच्या कारणावरून हा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. चाकण पोलीस तपास करत आहेत.