पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी), खुल्या (ओपन), तसेच महिला आरक्षित जागांसाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. मतदार यादी प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. आता १४ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि भोर (ताथवडे गाव) या विधानसभा मतदारसंघांची मतदारयादी प्रभागनिहाय विभाजन करून तयार करण्यात आली आहे. ती सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. परंतु, निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला आहे. त्यानुसार आता १४ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर २२ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील मतदारयादी कक्षात, तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वीकारण्यात येणार आहेत. हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या सहा डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. आठ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणाची आणि १२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

हरकतींवर सुनावणीसाठी उपायुक्तांची नियुक्ती

मतदारयादीवरील हरकती व सूचनांची छाननी करून निर्णय घेण्यासाठी सहशहर अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यात आता बदल केला असून, उपायुक्तांकडे जबाबदारी दिली आहे. उपायुक्त सीताराम बहुरे (‘अ’ आणि ‘फ’), राजेश आगळे ( ‘ब’ आणि ‘ग’), नीलेश भदाणे ( ‘ड’ आणि ‘ह’) आणि डॉ. प्रदीप ठेंगल (‘क’ आणि ‘इ’) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरक्षण सोडतीसाठी चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरक्षण सोडतीसाठी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सोडतीचा अहवाल आयोगास सादर केला जाईल. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी काढला आहे.

आरक्षण सोडतीवरही हरकती, सूचना

यंदा आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यावर निर्णय घेऊन महापालिका आयुक्त दोन डिसेंबरला आरक्षण अंतिम करणार आहेत. त्यानंतर आरक्षण सोडत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

आरक्षण सोडतीची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ११ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमानुसार सोडत काढली जाईल. – सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका