पिंपरी : दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणातून १९ जणांच्या टाेळक्याने कोयत्याने व लाेखंडी गजाने वार केले. हवेत कोयते फिरवून दहशत माजवत “आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये आलात तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना पिंपरीत घडली. याबाबत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील वाल्मिकी चौक व भाजी मंडई पार्किंग येथे दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. त्याला कोयता व लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. फिर्यादीने आरडाओरडा केला. त्यामुळे तिथे नागरिक जमले. आरोपींनी हवेत कोयते फिरवून दहशत माजवत “आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये आलात तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
दापोडीत ट्रेडिंगच्या नावाखाली १६ लाखांची फसवणूक
ट्रेडिंगच्या नावाखाली एका नागरिकाची १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना दापोडी येथे घडली. याबाबत ५१ वर्षीय व्यक्तीने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाइल धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ जुलै ते २० ऑगस्ट या कालाधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला शेअर मार्केट गुंतवणुकीबाबतची माहिती दिली. समाजमाध्यमातील व्हॉट्सॲपमधील एका समूहात समाविष्ट केले. एका संकेतस्थळावर खाते उघडण्यास सांगितले. सुरुवातीला नफ्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेतले. खात्यावर ६० लाख रुपये जमा झाल्याचा आभास निर्माण करून त्यासाठी अजून ४२ लाख रुपये भरण्यास सांगितले. पैसे परत न देता ऑनलाइन माध्यमातून १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी दापोडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
जमीन खरेदीच्या व्यवहारात बांधकाम व्यावसायिक महिलेची फसवणूक
विकलेल्या जमीनींच्या सातबारा नोंदणीस हरकत घेत त्याच जमीनी पुन्हा विकण्याच्या उद्देशाने खरेदीखत करून पुण्यातील महिला बांधकाम व्यावसायिकेची फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तीनही घटना खेड तालुक्यातील केळगाव येथे २४ फेब्रुवारी २०२३ ते २ जुलै २०२५ यादरम्यान घडल्या आहेत. याप्रकरणी ४८ वर्षीय बांधकाम व्यावसायिक महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच महिलांसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी केळगावातील जमीनी आरोपींकडून रितसर खरेदीखताद्वारे खरेदी केली होती. त्यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करून वेगेवगेळ्या दिवशी याच जमिनी दुसऱ्या खरेदीदारांना खरेदीपत्राद्वारे विकली. फिर्यादी यांनी विकत घेतलेल्या जमिनीच्या सातबारावर स्वतःच्या नावाच्या नोंदणीसाठी अर्ज केला असता आरोपींनी नोंदणीस हरकत घेत फसवणूक केली. तिन्ही घटनांचा आळंदी पाेलीस तपास करत आहेत.