पिंपरी : वारंवार आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांच्या ८८ मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा ५ ऑगस्ट रोजी लिलाव होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना २ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, सराफी व्यापाऱ्यांच्या बिगरनिवासीसह निवासी मालमत्तांचा समावेश आहे.

महापालिकेला बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे करसंकलन विभाग हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मागील पाच वर्षांपासून कोणतीही करवाढ न करता थकीत करवसुलीवर भर दिला. विनानोंद मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांना करकक्षेत आणले. परिणामी, उत्पन्नात भर पडली. आता जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा…उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती

महापालिकेचा कर वर्षानुवर्षे थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना गेल्या वर्षी नोटीस बजावली होती. तरीही प्रतिसाद न दिल्याने ८८ मालमत्ता जप्त केल्या गेल्या. त्यांचा लिलाव केला जाणार आहे. ५० हजारांपासून तीन लाख रुपयांपर्यंत कर थकबाकी असलेल्या या मालमत्ता आहेत. त्यांचे बाजारमूल्य किमान १९ लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची ‘ड’ मधील प्रकरण आठ (कराधान) नियम ४२ ते ४७ मधील तरतुदींनुसार मालमत्तांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

हेही वाचा…डांबून ठेवलेल्या तीन पोपटांची सुटका ‘पेटा इंडिया’, वन विभाग यांची संयुक्त कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी महापालिकेचा करसंकलन विभाग, मुख्य कार्यालयात २ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या प्रतींसह लेखी अर्जाद्वारे नोंदणी करावी. लिलावातील मालमत्तांबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि इतर यांचे आर्थिक हितसंबंध, हरकती असल्यास योग्य त्या कागदपत्रांसह ३ ऑगस्टपूर्वी लेखी स्वरूपात नोंदवाव्यात. ५ ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत करआकारणी आणि करसंकलन विभागाच्या कार्यालयात ही लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.