पिंपरी : विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, विविध पथकांच्या कंपन्यांसह ४ हजार ३३३ पोलीस सज्ज असणार आहेत. आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी ४३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर, ४९ पिस्तुलांसह १०० काडतुसे, ९३ कोयते, तलवारी अशी हत्यारे जप्त केली आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, पथसंचलन तसेच मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्यासह ४३३३ पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात असणार आहे. तसेच, हरियाणा राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांचाही बंदोबस्त मागवण्यात आला आहे. पोलिसांची विशेष पथकेही शहरात गस्तीवर असणार आहेत. गर्दी होणार्‍या किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असणार्‍या केंद्रांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे.

हेही वाचा – मुलांना आहारात दूध देण्यास पुणेकर पालकांची पसंती! सर्वेक्षणात समोर आलेली प्रमुख कारणे जाणून घ्या

विधानसभा निवडणूक भयमुक्त, पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पडावी, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून सर्व हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मावळ, पिंपरी, भोसरी, चिंचवड, भोर, खेड-आळंदी हे विधानसभा मतदारसंघाचा भाग येत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान अवैधरीत्या वाहतूक करीत असलेली एक कोटी ७६ लाख १७ हजार ५१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच, अवैध पिस्तुले ४९ व १०० काडतुसे, कोयता, तलवार अशा प्रकारची ९३ शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच, एक कोटी १४ लाख ३२ हजार ३८२ रुपये किमतीचा अवैध दारुसाठा यासह ४१ किलो ४६२ ग्रॅम गांजा त इतर अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून, विविध कायद्यांतर्गत १४३८ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. १० गुन्हेगारी टोळ्यांतील ४१ आरोपीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली असून सात आरोपींना स्थानबद्ध केले आहे.

असा आहे पोलीस बंदोबस्त

एक पोलीस सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, नऊ सहायक पोलीस आयुक्त, २२१ निरीक्षक / सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक, ३०९५ अंमलदार, १००० होमगार्ड, सीमा सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस दल, बीएसएफच्या प्रत्येकी दोन कंपन्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि हरियाणा पोलीस असा बंदोबस्त असणार आहे.

आयुक्तालयाची निवडणुकीच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक ही निर्भय वातावरण, निप:क्षपाती, शांतता व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालय सुसज्ज आहे. नागरिक पोलिसांना कोणत्याही स्वरूपाची माहिती न घाबरता देऊ शकतात. नागरिक, कार्यकर्ते यांनी नियमांचे पालन करून पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

पिंपरी : बालेवाडीतील स्ट्राँगरूमची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी : मतदान झाल्यानंतर पिंपरी आणि भोसरी मतदारसंघातील मतदान यंत्र (इव्हीएम मशिन) बालेवाडी येथील ‘स्ट्राँग रुम’मध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील सुरक्षेचा आढावा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मंगळवारी (१९ नोव्हेंबर) घेतला.

हेही वाचा – कोरेगाव पार्क भागातील मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते उपस्थित होते. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पिंपरी, चिंचवड, भोसरी या प्रमुख मतदारसंघासह मावळ, खेळ-आळंदी, भोर असे एकूण आठ मतदारसंघ येतात. राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र थेरगाव येथे ठेवण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, भोसरी आणि पिंपरी मतदारसंघातील मतदान यंत्र बालेवाडी स्टेडियम येथे ठेवण्यात येणार आहेत. बालेवाडीतील याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. यामुळे येथील स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रातील सुरक्षिततेचा आढावा पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी अधिकार्‍यांना सूचनाही केल्या.