पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका महिन्यात तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मकोका) कारवाई केली. त्यामध्ये एकूण २१ गुन्हेगारांचा समावेश आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील ४४ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. चार गुन्हेगारांना एक वर्षासाठी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबद्ध करण्यात आले आहे.

बावधन पोलीस ठाण्‍यातील खुनी हल्‍ल्‍याच्‍या गुन्‍ह्यात सूरज ऊर्फ सोन्या पवार व १२ साथीदारांवर सात गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्‍यात आली. काळेवाडी पोलीस ठाण्‍यातील गुन्‍ह्यासह सुनिल ऊर्फ शेट्टी ठाकूर व तीन साथीदारांवर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यातील गुन्‍ह्यात नितीन शिंदे व तीन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली असून या टोळीवर सहा गंभीर गुन्हे नोंद आहेत.

या टोळ्यांनी बावधन, काळेवाडी, सांगवी, वाकड, हिंजवडी, महाळुंगे, चाकण तसेच पुणे ग्रामीण व इतर ठिकाणी दहशत माजवून गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. हिंसाचाराच्या धमक्या देऊन व धाक दाखवून अवैध आर्थिक फायदा मिळवण्याचे त्यांच्या टोळ्यांचे उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. सन २०२५ मध्ये आतापर्यंत ३१ संघटित गुन्हेगारी टोळ्यांतील १६० आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी सांगितले.

४४ गुन्हेगार तडीपार

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हद्दीतील ४४ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करणे आणि विक्री केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. परिमंडळ एक मधील तीन, परिमंडळ दोन मधील २२ आणि परिमंडळ तीन मधील १७ गुन्हेगारांचा समावेश आहे. मागील नऊ महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २५० पेक्षा अधिक गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

चौघांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई

पिंपरी मधील हर्ष उर्फ अमर बहोत (२०), म्हाळुंगे एमआयडीसी मधील प्रल्हाद शांताराम बच्चे (३०) आणि रामदास मच्छिन्द्र हानपुडे (४०), हिंजवडी मधील स्वप्नील बाळासाहेब पवार (२४) या आरोपींना एक वर्ष कालावधीसाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. नऊ महिन्यात २२ जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.