पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षणात (२०२४-२५) देशात सातवा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावणारी पिंपरी-चिंचवड महापालिका केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ शहर जोडी उपक्रमां’तर्गत राज्यातील पाच शहरांना स्वच्छतेचे धडे देणार आहे. याबाबत आळंदी नगरपरिषद, मंचर नगरपंचायत, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषद, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा नगरपंचायत आणि भंडारा जिल्ह्यातील लांखादूर नगरपंचायतीसोबत सामंजस्य करार करण्यात आला.

केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दृक-श्राव्य माध्यमाद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्स) बैठकीत हा करार झाला. महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, मुख्याधिकारी माधव खांडेकर, अजय साळवे, गोविंद जाधव, सचिन कुमार पटेल या वेळी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आराेग्य विभागाने शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. २०२४-२५ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात देशात सातवा आणि राज्यात प्रथम क्रमांक आल्यानंतर महापालिका प्रशासनाने २०२५-२६ मध्ये देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी आतापासूनच विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ शहर जोडी उपक्रमांतर्गत’ उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शहरांना उत्तम कामगिरी करण्यासाठी काही स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपरिषद, मंचर नगरपंचायत, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषद, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा नगरपंचायत आणि भंडारा जिल्ह्यातील लांखादूर नगरपंचायत प्रशासनाला मार्गदर्शन करणार आहे. ही लहान शहरे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पाच नगरपरिषदांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

महापालिका सर्व नगरपरिषदांना स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी साध्य करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. अनुभव, तंत्रज्ञान व व्यवस्थापन पद्धतीचा लाभ या संस्थांना दिला जाईल. या नगरपरिषदांच्या कामगिरीत सातत्याने वाढ होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, मार्गदर्शन, सहकार्य केले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या पुढील टप्प्यात महापालिकेने केवळ शहरापुरते मर्यादित न राहता इतर शहरांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या लहान शहरांनी स्वच्छतेत चांगली कामगिरी केल्यास त्यांचे गुण वाढतील. त्यानुसार महापालिकेलाही स्वच्छतेमध्ये गुण मिळणार आहेत, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.