पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील मार्गावर विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अर्बन स्ट्रीट, जलवाहिनी आणि महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदाई केली असून, रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना अडचणींना सामोरे जात खडतर मार्गातून वाट काढावी लागणार आहे. पालखी सोहळ्यापूर्वी पिंपरी ते निगडी मार्गावरील मेट्रोचे काम आठ दिवस बंद करण्याची मागणी देहू संस्थानने केली आहे.
श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४०व्या पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान १८ जून रोजी होणार आहे. १९ जून रोजी पालखी पिंपरी-चिंचवड शहरात मुक्कामी असेल. आकुर्डीत एक दिवस पालखीचा मुक्काम असतो. तर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २० जून रोजी शहरातून पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. देहूगाव ते देहूरोड दरम्यान पालखी मार्ग अरुंद आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना पायी चालताना अडचणींना सामोरे जावे लागते. या मार्गाचे रुंदीकरण करण्याची अनेक वर्षांची वारकऱ्यांची मागणी अपूर्णच आहे.
पालखी जुन्या पुणे-मुंबई महामार्ग मार्गे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दाखल होते. महापालिकेकडून येथे पालखीचे स्वागत केले जाते. परंतु, येथे महामेट्रोच्या कामासाठी खोदाई केली आहे. ही खोदाई पुढे पिंपरीपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे पालखी रथ, वारकऱ्यांना चालताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यापूर्वी मेट्रोचे काम आठ दिवस बंद करण्याची मागणी देहू संस्थानने केली आहे. दरम्यान, श्री क्षेत्र आळंदी संस्थान, श्री क्षेत्र देहू संस्थान, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टसोबत महापालिका प्रशासनाने बैठक घेतली व तयारीची माहिती दिली.
संस्थानच्या सूचना
पालखी मार्गावर दिशादर्शक फलक, पिंक टॉयलेटची व्यवस्था, मोटार सायकल रुग्णवाहिका, पुरेसे स्वच्छता, स्नानगृहे उपलब्ध करून द्यावीत. मोकाट जनावरांचा बंदोबस्त, सुरक्षा कठड्यांची व्यवस्था, काम सुरू असलेल्या ठिकाणी संरक्षक उपाययोजना कराव्यात. वृक्ष फांद्यांची छाटणी, पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घ्यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना संस्थानने केल्या.
महापालिका, पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. पालखी मार्गाची वेळोवेळी पाहणी करून खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या वाहनतळाच्या जागांसंदर्भातील फलक, महापालिकेमार्फत वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांसंदर्भातील फलक, पालखी मार्गावर दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
वारकऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही. पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही. मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या सुरू असलेल्या कार्यवाहीचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. – शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
पालखी मार्गावर निगडी ते पिंपरी दरम्यान विविध कामे सुरू आहेत. पालखी रथ, वारकऱ्यांना चालताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महामेट्रोचे, महापालिकेची सुरू असलेली कामे पालखी सोहळ्यादरम्यान बंद करण्याची मागणी केली आहे. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.- गणेश मोरे, पालखी सोहळा प्रमुख, देहू संस्थान