पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारपर्यंत शहरातील आठ प्रभागांतून चार हजार ३२ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरणपूरक ८२२ तर पीओपीच्या तीन हजार २१० मूर्तींचा समावेश आहे. महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. मूर्ती पीओपीची आहे की शाडू मातीची आहे, याप्रमाणे नोंद केली जात आहे.
मूर्तींचे संकलन झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले जात आहे. महापालिकेच्या मूर्ती संकलन उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसह सार्वजनिक मंडळांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून २९ ऑगस्टपर्यंत महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर चार हजारांपेक्षा जास्त मूर्तींचे संकलन झाले आहे.
‘पुनरावर्तन’ मोहिमेला प्रतिसाद
महापालिका यंदा गणेशोत्सव काळात इको एक्झिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने ‘पुनरावर्तन’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर ती माती पुन्हा संकलित करून मूर्तिकारांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर मूर्तिकार ती माती पुन्हा मूर्तीसाठी वापरू शकणार आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इको एक्झिस्ट फाउंडेशनच्या शामा देव, मैत्रेय घोरपडे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक यांचे सहकार्य या उपक्रमासाठी मिळत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मूर्ती संकलन उपक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग वाढत आहे. मूर्ती संकलन मोहिमेमुळे नदी-नाल्यांचे प्रदूषण रोखण्यात मोठी मदत होईल. संकलित झालेल्या मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले जाईल. संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका