पिंपरी : हिंजवडी येथील एका कंपनीला बनावट ई-मेल पाठवून साहित्याचे एक लाख ३२ हजार ६५० रुपये घेत फसवणूक केली. या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीला साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादार कंपन्यांचे पैसे पाठवण्यासाठी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या कंपनीला एका मेलद्वारे बनावट बँक खाते दिले. त्या बँक खात्यावर दोन पुरवठादार कंपन्यांचे पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांच्या कंपनीने संबंधित बँक खात्यावर एक लाख ३२ हजार ६५० रुपये पाठवले. ही रक्कम पुरवठादार कंपन्यांना मिळाली नसल्याची बाब काही दिवसांनी उघडकीस आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
बेकरी मालकावर कोयत्याने वार
एका टोळक्याने बेकरी मालकाला कोयत्याने मारहाण करत ४० हजार रुपयांची रोकड लुटून दहशत निर्माण केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी सादिक युसुफ अन्सारी (२६, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश दुर्गे (पिंपळे सौदागर) आणि सुमित पुरी (पिंपळे सौदागर) या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या तपशिलानुसार, फिर्यादी अन्सारी हे बेकरी चालवतात. आरोपी बुधवारी रात्री बेकरी मध्ये आले. त्यांनी दहशत निर्माण करत अन्सारी यांना दमदाटी केली. अन्सारी यांच्यावर कोयत्याने वार केले. बेकरी मध्ये तोडफोड करून हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण करत ४० हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
बांधकाम कार्यालयात राडा; महिलेवर गुन्हा
चिंचवड येथील एका बंधकाम कार्यालयात महिलेने जबरदस्तीने प्रवेश करून तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावल्याची घटना घडली. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका बांधकाम कार्यालयात नोकरी करतात. ते त्यांच्या कामावर असताना गुरुवारी दुपारी आरोपी महिला तिथे आली. तिने फिर्यादी आणि त्यांच्या मालकाला शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर महिलेने जबरदस्तीने कार्यालयात प्रवेश करून सर्वांना शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
गांजा विक्री प्रकरणी एकास अटक
गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई पुनावळे येथे करण्यात आली. संतोष देवराम कांबळे (४१, भिमनगर, तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रतिक कवडे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील दर्शले चौकाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संतोष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६१ हजार ७०० रुपये किमतीचा २३४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. रावेत पोलीस तपास करत आहेत.