पिंपरी : हिंजवडी परिसरात अवजड वाहनांमुळे अपघात होत असल्याने या वाहनांना सकाळी आठ ते बारा आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या वाहन चालकांकडून नियमाचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अवजड वाहनाने आणखी एक बळी घेतला आहे. भरधाव ‘सिमेंट मिक्सर’च्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी हिंजवडी-माण रस्त्यावरील पांडवनगर येथे घडला.

भारती राजेश मिश्रा (वय ३०, रा. थेरगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मिक्सर चालक मोहंमद अब्बास अल्ताफ (वय २५, रा. वाघजाई मंदिरासमोर, चांदे) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी-माण रस्त्यावर पांडवनगर चौकाजवळ भरधाव आलेल्या सिमेंट मिक्सर वाहनाने भारती यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्या खाली पडल्याने चाक डोक्यावरून गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक अल्ताफ हा पळून गेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

नऊ महिन्यांत चार महिलांचा मृत्यू

हिंजवडी आयटी पार्कमध्ये सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र, या बंदी आदेशाचे उल्लंघन करून अवजड वाहने सर्रासपणे प्रवेश करतात. या अवजड वाहनांनी गेल्या नऊ महिन्यांत चार महिलांचा बळी घेतला.

५० वाहन चालकांवर गुन्हे

हिंजवडी परिसरात अवजड वाहनांना सकाळी आठ ते बारा आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. या आदेशाचे अवजड वाहन चालकांकडून उल्लंघन केले जात आहे. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. आतापर्यंत ५० वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.