पिंपरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासू आणि मेहुण्यावर चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी जावयाला अटक केली आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी सासूने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २४ वर्षीय जावयाला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दमदाटी करत तिला मारहाण केली. त्याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. तिला वाचवण्यासाठी आई आणि भाऊ आले असता आरोपीने त्या दोघांवरदेखील चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
हे भांडण सुरू असताना आजूबाजूचे लोक जमा झाले. आरोपीने ‘मी या एरियाचा भाई आहे. कोणी मध्ये आले तर त्याला ठार मारीन’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
क्रेन बाजूला घेण्याच्या कारणावरून वाद, ३२ जणांवर गुन्हा
क्रेन बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ३२ जणांच्या टोळक्याने क्रेनचालक आणि क्रेनमालकावर हल्ला केला. ही घटना चिखलीतील कुदळवाडी घडली. याप्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा क्रेनचालक आणि टेम्पोचालक यांच्यात क्रेन साइडला घेण्यावरून वाद झाला. त्यातून टेम्पो चालकाने आपले साथीदार बोलावून फिर्यादींच्या क्रेन चालकाला शिवीगाळ आणि मारहाण केली. वाद मिटवण्यासाठी फिर्यादींचा मुलगा तेथे आला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर राग धरून आरोपींनी हातात लाकडी दांडके आणि कोयते घेऊन येत जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी क्रेनच्या काचा फोडून नुकसान केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.
भोसरीत मोबाइल हिसकावला
रस्त्यावरून जात असलेल्या तरुणाचा मोबाइल हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना भोसरीतील सहल केंद्र, अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ घडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून चोरट्याला अटक केली आहे.
याप्रकरणी रेहान सोहराब अन्सारी तौसिफ (१८, गुळवे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर धर्मेंद्र सूर्यवंशी (चऱ्होली फाटा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मित्रासह घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोटोरोला कंपनीचा लाल रंगाचा मोबाइल फोन हिसकावून घेतला आणि पळून गेला. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेतला आणि मयूर सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
मोबाइल हिसकावणाऱ्यास नागरिकांनी पकडले
रस्त्याने बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावला. तरुणाने आरडाओरडा केला असता नागरिकांनी एका चोराला पकडले. ही घटना खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली. अखिलेश सुखचंद मेहरा (२७, आरूवस्ती खराबवाडी) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारुती किसन साबळे (२५, आंबोली) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अखिलेश हे फोनवर बोलत जात होते. त्या वेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी मोबाइल जबरदस्तीने हिसकावला आणि पळून जाऊ लागले. त्या वेळी अखिलेश यांनी आरडाओरडा केला. दरम्यान, अखिलेश यांच्या ओळखीच्या दोघांनी दुचाकीवरील मारुतीला पकडले. त्याचा दुसरा साथीदार पळून गेला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
गांजा विक्रीप्रकरणी तरुणास अटक
गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी मावळ तालुक्यातील जांबे येथे करण्यात आली. विशाल बाजीराव खाडे (२२, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील जांबे गावात एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीसांनी जांबे येथील एका चहाच्या दुकानासमोर सापळा लावला. गांजा विक्रीसाठी आलेल्या विशाल खाडे याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५६० ग्रॅम वजनाचा गांजा, एक दुचाकी आणि मोबाइल फोन असा एकूण ८८ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.