पिंपरी : विवाहविषयक संकेतस्थळावरून महिलेशी ओळख करून तिला विवाहाचे आमिष दाखवून तीन कोटी १६ लाख ७८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दिल्ली-हरियाणा सीमेवरून अटक केली. रणजित मुन्नालाल यादव (वय २७), सिकंदर मुन्ना खान (वय २१), बबलू रघुवीर यादव (वय २५, तिघे रा. मंडीगाव, जॉनपूर, दक्षिण दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेशी विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून आरोपींनी संपर्क साधला होता. आरोपीने आपण एका मोठ्या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असल्याचे सांगितले. विविध कारणे सांगून त्याने १० जुलै २०२३ ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादीकडून ८१ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तीन कोटी १६ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यावर आरोपी गायब झाले आणि समाजमाध्यमांचा वापर करून पोलिसांना गुंगारा देऊ लागले. आरोपींनी एकाच पत्त्यावर ११ बँक खाती उघडून त्यातून पैसे वेगवेगळ्या ३०० ते ४०० खात्यात वळविले होते. रणजितने स्वत:च्या खात्यावर ३६ लाख ९६ हजार रुपये घेतल्याचे उघडकीस आले. बबलूने वेगवेगळ्या एटीएममधून रक्कम काढून मुख्य आरोपीकडे सुपूर्द केली.
विवाहविषयक संकेतस्थळावरून संपर्क साधणाऱ्या परदेशी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी. अशा माध्यमातून पैशांची मागणी केल्यास तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.- डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त