दत्ता जाधव

पुणे : टोमॅटोच्या दराचा भडका उडाल्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे. पण, पावसाअभावी अपेक्षित लागवड होताना दिसत नाही. खरीप हंगामात राज्यात सरासरी ४० हजार हेक्टरवर लागवड होते. यंदा १३ जुलैअखेर सरासरीच्या पन्नास टक्केच म्हणजे १८,४३८ हेक्टरवरच लागवड झाली आहे.

राज्यात १३ जुलैअखेर १८,४३८ हेक्टरवर टोमॅटो लागवड झाली आहे. त्यात नाशिक विभाग आघाडीवर आहे. नाशिक विभागात सर्वाधिक १०,६२२ हेक्टर, पुणे विभागात २,८०१ हेक्टर, लातूर विभागात २,४९० हेक्टर, औरंगाबाद विभागात १,१४७ हेक्टर, अमरावती विभागात ५७८ हेक्टर, कोल्हापूर विभागात ५७७ हेक्टर आणि नागपूर विभागात २२३ हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली आहे. मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे अपेक्षित लागवड होऊ शकली नाही. आता दरवाढ पाहून शेतकरी लागवड करीत आहेत. पण, टोमॅटोच्या रोपांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. राज्यभरातील रोपवाटिकांमधून टोमॅटोच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर आगाऊ नोंदणी झालेली आहे.

हेही वाचा >>>प्रवास यातना! गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण

नाशिकवर देशाचे लक्ष

नाशिक जिल्ह्यात १०,५५१ हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड झाली आहे. त्यामुळे नाशिकमधून टोमॅटो लवकर बाजारात येईल आणि दरवाढीपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केली आहे. पण, नाशिकमधील लागवडही पन्नास टक्क्यांवर आली आहे. रोप लागणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी टोमॅटोची काढणी सुरू होते. त्यामुळे नव्याने झालेल्या लागवडीचा टोमॅटो बाजारात येण्यास पंधरा ऑगस्ट उजाडणार आहे.

हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण

टोमॅटो २०० रुपये किलोंवर का?

पंजाबमध्ये टोमॅटो २०० रुपये किलोंवर पोहचला आहे. राजधानी दिल्लीत १७५ रुपयांवर आहे. दिल्ली आणि परिसराला हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून टोमॅटोचा पुरवठा होतो. दक्षिण भारतातून होणारा पुरवठा कमी झाला आहे आणि उत्तर भारतात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या काढणीत आणि वाहतुकीत अडथळे येत असल्यामुळे हिमाचल प्रदेशातून होणारी टोमॅटोची आवक घटली आहे. परिणामी बाजारातील उपलब्धता कमी होऊन दर २०० रुपयांवर गेला आहे. केंद्र सरकार टोमॅटोच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. पण, नजीकच्या भविष्यात टोमॅटोच्या दरात नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे. अजून महिनाभर दर चढेच राहणार आहेत.

महिनाभर दर चढेच

दरवाढीमुळे लागवडींचा वेग वाढला आहे. रोपवाटिकांमधील लावणीयोग्य रोपे संपली आहेत. लागवडीसाठी रोपांचा तुटवडा जाणवत आहे. नव्या रोपांसाठी मोठ्या प्रमाणावर आगाऊ नोंदणी सुरू आहे. अजून महिनाभर टोमॅटोचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती नारायणगाव (पुणे) येथील प्रगतीशील शेतकरी शिवाजी आवटे यांनी दिली.