प्रचारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांचा चिकन बिर्याणीवर ताव

निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांच्या जिभेचे चोचले विविध पक्षीय उमेदवारांकडून पुरवण्यात येत आहेत. पक्षाचे कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहून फारपूर्वी प्रचार करायचे. प्रसंगी पदरमोड करून कार्यकर्ते चहापाण्याचा खर्च भागवायचे. आता मात्र दिवस बदलले आहेत. निवडणुकीचे तंत्रदेखील बदलले आहे. महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहारापोटी बिर्याणीचा मेनू ठेवण्यात आला आहे. तसेच पदयात्रा, रॅली, मेळावे आदी कार्यक्रमांनंतरही बिर्याणीचा मेनू आहे. त्यामुळेच बिर्याणीसाठी लागणाऱ्या चिकनच्या मागणीत गेल्या आठवडय़ापासून चांगलीच वाढ झाली आहे.

पुणे शहरात दररोज दोनशे ते अडीचशे टन जिवंत कोंबडय़ाची (लाईव्ह बर्डस) खरेदी केली जाते. गेल्या शुक्रवारपासून (१० फेब्रुवारी) चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या चिकन विक्रेत्यांकडून

दररोज तीनशे टन जिवंत कोंबडय़ाची खरेदी केली जाते. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात मागणीत आणखी वाढ होईल, अशी माहिती रूपेश अ‍ॅग्रोचे रुपेश परदेशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

केटरींग व्यावसायिकांकडून बनवून देण्यात येणाऱ्या एक किलो चिकन बिर्याणीचा भाव सातशे रूपये आहे. तर मटन बिर्याणीचा भाव एक हजार रूपये किलो आहे. प्रचारात भाग घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये नेऊन बिर्याणी खायला देणे उमेदवारांना परवडत नाही. त्यामुळे बिर्याणी तयार करून देण्याचे काम काही उमेदवारांनी केटरींग व्यावसायिकांवर सोपवले आहे. काही उमेदवार आमच्याकडून चिकनची खरेदी करतात आणि चिकन केटरींग व्यावसायिकांना देतात. पुणे शहरातील चिकनविक्रेत्यांकडून दोनशे ते अडीचशे टन चिकनची खरेदी केली जाते. निवडणुकांमुळे चिकन विक्रीत वाढ झाली असून जवळपास तीस टक्क्य़ांनी मागणी वाढली आहे, अशीही माहिती परदेशी यांनी दिली. चिकन बिर्याणीसोबत चिकन कुरमा या प्रकाराला उमेदवारांकडून मागणी आहे. पाव किंवा पोळीसोबत पातळसर चिकन कुरमा खाल्ला जातो. पुणे शहरात जिवंत कोंबडय़ांचा पुरवठा व्हेकींज इंडिया लि., बारामती अ‍ॅग्रो तसेच सगुणा फूडसकडून केला जातो. चिकनच्या मागणीत वाढ झालेली असली तरी भावात वाढ झालेली नाही. प्रतिकिलो १४० रूपये दराने चिकनची विक्री केली जात आहे.

भेळभत्ता ते चिकन बिर्याणी

महापालिकेची असो वा ग्रामपंचायतीची निवडणूक. काही वर्षांपूर्वी निवडणुका कार्यकर्त्यांचा बळावर लढवल्या जायच्या. प्रचारात दमलेल्या कार्यकर्त्यांसाठी भेळभत्त्याचा कार्यक्रम असायचा. पक्षाच्या कार्यालयात सतरंज्यावर बसलेले कार्यकर्ते भेळभत्यावर ताव मारून प्रचाराची रणनीती आखायचे. आता असे दृश्य बघायला मिळत नाही.