पुणे : पुणे शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांना रस्त्यावरील पुणे महापालिकेच्या खांबांमधून सर्रास बेकायदा वीजजोडणी घेतली जात असताना पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने केलेल्या पाहणीत केवळ ८७ ठिकाणीच अशी वीजचोरी होत असल्याचे आढळले आहे!
नाना पेठेतील इनामदार चौकात दोन आठवड्यांपूर्वी दिवंगत माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांच्या नावाच्या फलकाला हात लागल्याने एका लहान मुलीला विजेचा धक्का बसून त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासात हा विद्युत प्रवाह अनधिकृतपणे घेण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी शिवम आंदेकर याच्यावर गुन्हादेखील दाखल केला.
विजेचा धक्का लागून झालेल्या या घटनेमुळे खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने शहरात बेकायदा पद्धतीने वीजजोड घेऊन फलक लावणारे, राजकीय कार्यालय थाटणारे आदींवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार सर्व अभियंत्यांना अनधिकृत वीजजोड शोधून ते काढून टाकण्याची कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले. त्यानंतर पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालय, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आदींच्या हद्दीत दहापेक्षा जास्त वीजचोरीचे प्रकार आढळून आले. इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत हे प्रमाण कमी आहे.
वीजचोरी केल्याप्रकरणी महापालिकेने कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यांनी घेतलेले वीजजोड तोडण्यात आले असून, पुन्हा असे प्रकार करू नका, असे बजावले आहे. पुन्हा वीजचोरी केल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल. – मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता, विद्युत विभाग.