पुणे : महापालिकेच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. त्यामुळे ज्या कंपनी मार्फत हे सुरक्षारक्षक कामाला लागले आहेत. त्या कंपनीच्या ठेकेदाराला महापालिकेच्या सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारती बरोबरच १५ क्षेत्रीय कार्यालये, पाणीपुरवठा करणारी जलशुद्धीकरण केंद्र, आरोग्य केंद्र, दवाखाने, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडांगण, स्मशानभूमी, मंडई, माध्यमिक शाळा, कचरा हस्तांतरण केंद्र, उद्याने, अशा महापालिकेच्या विविध वास्तूच्या ठिकाणी सुरक्षा पुरविण्यासाठी महापालिकेने खाजगी ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. महापालिकेत जवळपास १६०० पेक्षा अधिक कंत्राटी पद्धतीने काम करणारे सुरक्षारक्षक आहेत.
काही वर्षापूर्वी महापालिकेत सुरक्षारक्षक म्हणून महिला किंवा पुरुषांना नेमले जात होते. तृतीयपंथी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने ५० तृतीय पंथीयांना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीमार्फत पहिल्या टप्प्यात महापालिकेत २५ तृतीयपंथीयांना कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांची नेमणूक महापालिकेचे मुख्य भवन, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय, ठोसर पागा स्मशानभूमी, कमला नेहरू रुग्णालय येथे केल्या आहेत. हे सर्व सुरक्षारक्षक नित्यनियमाने हे काम करत असून त्यांच्या कामाचा महापालिकेच्या सुरक्षा विभागालाही फायदा देखील होत आहे.
संबधित सुरक्षारक्षक ज्या ठेकेदार कंपनीमार्फत कामावर आहेत. त्या ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेस यांनी पूर्वीचे नाव व आत्ताचे नाव वेगळे आहे, असे कारण देत गेल्या तीन महिन्यांपासून यातील १३ तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांचे वेतन थांबविले आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यातच आता या ठेकेदाराचे काम संपुष्टात आले असून नवीन ठेकेदाराला सुरक्षारक्षक पुरविण्याची निविदा देण्यात आली आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांमध्ये थकित वेतन मिळेल की नाही? याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या सुरक्षा रक्षकांचे वेतन थकविल्याबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांनी ईगल कंपनीला नोटीस बजावली आहे.
फंडातून केली मदत
कंत्राटी पद्धतीने महापालिकेत काम करणाऱ्या तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत होते. ते रहात असलेल्या घरांचे भाडे, औषधे व इतर अत्यावश्यक खर्चाची अडचण लक्षात घेवून महापालिकेतील सुरक्षा विभागातील त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्गणी काढून ४० हजाराचा फंड जमा केला. या फंडाच्या माध्यमातून या १३ जणांना आर्थिक मदत करण्यात आल्याचे सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
ईगल कंपनीने १३ तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांना नोटीस दिली आहे. या नोटीसद्वारे थकित वेतन, इतर सुरक्षा रक्षकांचा ईएसआय, पीएफ, विविध कारणाने कपात केलेला पगार या सेवा-सुविधा दिल्याशिवाय साडेचार कोटीचे कंपनीचे बिल दिले जाणार नाही. – राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका.