पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचलनात इलेक्ट्रिक आणि सीएनजी इंधनावर आधारित बसची संख्या वाढत आहे. त्यानुसार ‘पीएमपी’ प्रशासनाने चार्जिंग आणि सीएनजी स्थानकांचे नियोजन करून १४ मार्गांचा विस्तार केला आहे, तर ६४ बसच्या वेळापत्रकात बदल करून तोट्यातील दोन मार्गांवरील ‘पीएमपी’ची सेवा बंद केली आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाने भाडेवाढ केल्यानंतर पीएमपीची सुलभ आणि गतिमान सेवा देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार मार्गिकांवर ‘पीएमपी’सेवा सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. सद्य:स्थितीला स्वमालकीच्या ८२५, तर एक हजार २०२ बस भाडेतत्त्वावरील अशा एकूण दोन हजार २७ बस आहेत. यामध्ये ३५१ बस नव्याने दाखल झाल्या असून, त्यात इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. त्यामुळे फायद्यातील मार्गांवर या बसची सेवा सुरू करून संचलन तूट कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
चार्जिंगसाठी कालावधी वाढवला
पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगराच्या हद्दीपर्यंत ‘पीएमपी’ धावत असून, प्रवासी संख्या सरासरी १० लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. पीएमपी प्रशासनाला प्रति दिवस सरासरी २ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. प्रशासनाने ई-बस चार्जिंगसाठी वेळ वाढवून सुधारित वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार १४ मार्गांवरील ६४ पीएमपीची सेवा वाढवली आहे. जेणेकरून कमी खर्चात जास्त अंतर पार करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
सद्य :स्थितीला १४ मार्गावरील ६४ ‘पीएमपी’च्या वेळापत्रकात बदल केला आहे. भविष्यात स्व:मालकीच्या ६०० पेक्षा अधिक ‘पीएमपी’ सेवेत टप्प्याटप्प्याने दाखल होणार असल्याने नवीम मार्गांवर सेवा सुरू करण्यात येईल. त्यानुसार नवीम मार्गांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. – सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल