पुणे : सुटीच्या कालावधीत बससेवेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने हा तोटा भरून काढण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुरू केलेल्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून, ‘पीएमपी’च्या तिजोरीत भर पडली आहे. गेल्या सहा महिन्यांत २० लाख रुपये महसूल जमा झाला आहे.

साप्ताहिक सुटीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अल्प प्रतिसाद असल्याने गर्दी असलेल्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अतिरिक्त सेवा वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे महसुलात वाढ झाली आहे. ‘पुणे दर्शन’ आणि ‘पर्यटन बस’सेवेच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात ३.४७ लाख रुपये, फेब्रुवारीत २.१७ लाख रुपये, मार्च महिन्यात २.३६ लाख रुपये, एप्रिल महिन्यात १.५६ लाख रुपये, मेमध्ये ४.७५ लाख रुपये आणि जून महिन्यात सर्वाधिक ६.४८ लाख रुपये असे २०.८० लाख रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी-खासगी कार्यालये, तसेच औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांना शनिवारी, रविवारी सुटी असते. त्यामुळे दैनंदिन संचलनातील ‘पीएमपी’च्या मार्गिकांवर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असतो. त्याचा महसुलावर परिणाम होत असल्याने पीएमपी प्रशासनाने अल्प प्रतिसाद असलेल्या मार्गांवरील सेवेची वारंवारिता कमी करून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांपैकी कानिफनाथ गड, संगमेश्वर मंदिर (सासवड), जेजुरी दर्शन, कोंढणपूर, बनेश्वर, निळकंठेश्वर, सिंहगड पायथा, रामदरा, तुळापूर, भंडारा डोंगर पायथा, हडशी कमान, प्रतिशिर्डी, चिन्मय विभूतियोगसाधना केंद्र, श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर (निमगाव दावडी), श्री गजानन महाराज मठ (आळंदी) अशा अनेक ठिकाणी माफक दरात पीएमपीची वातानुकुलित ई-बससेवा उपलब्ध केली आहे. हडपसर, पुणे स्टेशन आणि स्वारगेट या ठिकाणांहून त्या त्या मार्गांवर ती सुरू आहे.

या ठिकाणी जाण्यासाठी १५ ते २० प्रवाशांनी एकत्रित आरक्षण केल्यावरही अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे पीएमपीच्या पुणे दर्शन आणि पर्यटन सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुटीच्या कालावधीत अल्प प्रतिसाद असलेल्या मार्गांवरील सेवा कमी करून गर्दी असलेल्या पर्यटनस्थळांवर मे महिन्यापासून बससेवा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सामूहिक आरक्षणाचा पर्याय देण्यात आला. या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल