पुणे : आयटी पार्क परिसरातील हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नागरी समस्यांसह वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची शासकीय यंत्रणांनी मंगळवारी (दि.१) संयुक्त पाहणी केली. यात नैसर्गिक ओढे-नाल्यांतील पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्या संस्थांनी निर्देशानुसार अपेक्षित दुरुस्ती केली का, याची तपासणी करण्यात आली. या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे उद्या (बुधवारी) मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत.
हिंजवडी टप्पा एक, दोन आणि तीन तसेच मेट्रो मार्गासह परिसरात १३ ठिकाणी ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलल्याचे अथवा अडवल्याचे समोर आले होते. त्यामुळे संबंधितांना पीएमआरडीए आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) नोटिसा बजावून पाण्याचा प्रवाह ३० जूनपर्यंत नैसर्गिकरीत्या मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणी आयुक्त डॉ. म्हसे यांच्यासह इतर शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संयुक्त पाहणी केली. त्यात हिंजवडी, माण, मारुंजी भागात पाहणी करून नोटीस बजाविलेल्या संबंधितांनी निर्देशानुसार काम केले, की नाही याची तपासणी केली. संबंधितांनी पाण्याचा प्रवाह खुला केला नसेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश या वेळी आयुक्तांनी दिले.
आयटी पार्क परिसरातील विविध ठिकाणांची पाहणी करून मेट्रो प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या कामाचा आढावाही घेण्यात आला. या वेळी पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे यांच्यासह इतर प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम
मारुंजी – विप्रो सर्कल रस्त्यावरील शेवटच्या ३०० मीटर अंतराचे काम उद्यापासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम ८ दिवसांत ते पूर्ण करणार आहेत. संबंधित रस्ता पुढे लक्ष्मी चौकात निघत असल्याने हिंजवडीतील वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. हे काम २०२२ पासून रखडले होते. या कामाला विरोध करणाऱ्यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे सादर करावीत, अन्यथा त्यांच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची कारवाई करण्यात येईल, असे डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.
हिंजवडी आयटी पार्कमधील जलकोंडीमागे अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण हिंजवडीतील नाले वळविले किंवा अडविले हे आहे. मेट्रोचे काम सुरू असून, त्याचा राडारोडा असलेल्या ठिकाणी दुभाजकांमधून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे पाणी तुंबत होते. मेट्रोचे काम असल्याने ही जबाबदारी पीएमआरडीएकडे आहे. याचबरोबर आयटी पार्कमध्ये पावसाळी वाहिन्या नसल्याने जलकोंडीला एमआयडीसी कारणीभूत आहे.- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए