पिंपरी : औद्याेगिक पट्ट्यासह चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, कचरा प्रश्न, एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चाकण कृती समितीतर्फे उद्या (गुरुवारी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

निगडीतील भक्ती-शक्ती चाैकामध्ये आंदाेलक माेटारीने येणार आहेत. येथून आंदाेलक पायी आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर धडकणार आहेत. या पायी मोर्चात खासदार अमाेल काेल्हे, आमदार बाबाजी काळे यांच्यासह उद्योजक, कामगार, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि चाकण परिसरातील सहभागी होणार आहेत.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्गाचे विस्तारीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या दोन्ही महामार्गांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी सप्टेंबर महिन्यात चाकण परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

एमआयडीसी, नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची समन्वयक संस्था म्हणून पीएमआरडीएची नियुक्ती झाली. मात्र, पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी केवळ बैठकांचे सत्र सुरू ठेवल्याचा आरोप चाकण कृती समितीने केला आहे. चाकणवासीयांच्या सहनशीलतेचा बांध फुटला आहे. मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून, चाकणवासीयांच्या पुढील पिढीसाठी आहे. त्यामुळे सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे सदस्य कुणाल कड यांनी केले आहे.

माेर्चा स्थगित करण्याचे ‘पीएमआरडीए’चे आवाहन

चाकण भागातील वाहतूक कोंडी साेडविण्यासाठी विविध रस्ते, अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. रस्त्यांच्या कामांच्या निविदांची छाननी सुरू आहे. ४०.७४ किलाेमीटर लांबीच्या ५५८ कोटी १२ लाख रुपये रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या परिसरातील रस्त्यांच्या विविध कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून १९६ काेटी ५० लाखांच्या रकमेला मान्यता दिली आहे. रस्त्यांसाठी भूसंपादनाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नियोजित मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन पीएमआरडीए प्रशासनाने केले आहे.

मोर्चा मार्गावरील वाहतूक वळविली

वाहतूककोंडी होऊ नये याकरिता सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत मोर्चा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. निगडी-प्राधिकरणातील काचघर चौक – भेळ चौक – संभाजी चौक – बिजलीनगर पुलापर्यंतच्या सेवा रस्त्यावरून येण्या-जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांना मुख्य मार्गाने इच्छित स्थळी जाता येईल.

बिजलीनगर पूल ते पीएमआरडीए कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून, या मार्गावरील वाहने एलआयसी कॉर्नरमार्गे इच्छित स्थळी जातील. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक यांनी केले आहे.