पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी यंदा लावलेल्या वाढीव बंदोबस्ताचा फटका माजी महापौर, माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बसला.
पुण्यातील मिरवणूक महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू होते. या कार्यक्रमासाठी राजकीय नेत्यांसह समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, महापौर, उपमहापौर, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह महापालिकेचे नगरसचिव; तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. मात्र, यंदा सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन मिरवणुकीसाठी मंडई परिसरात पोलिसांनी वाढीव बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे माजी महापौर, माजी नगरसेवक, महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथे जाण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत होता.
पोलिसांनी या परिसरात बॅरिकेडिंग करून राजकीय पदाधिकाऱ्यांनाही अडवून ठेवले. पुणे शहराच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे यांच्यासह महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बॅरिकेडच्या आत जाऊन न देता बाहेर थांबवले. मात्र, पोलिसांच्या या भूमिकेवर अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडविल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
वास्तविक महापालिकेच्या वतीनेच या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या असल्याने महापालिका आयुक्त हेच प्रशासक असून, ते ही जबाबदारी पार पाडत आहेत.
महापौर नसले, तरी कार्यक्रम महापालिकेचा असताना पोलिसांनी त्यावर ताबा मारण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेत नगरसेवक असताना महापौर हे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करतात. त्या वेळी अनेक माजी महापौर, उपमहापौर, यांच्यासह पदाधिकारी आवर्जून मंडई येथे उपस्थित राहतात. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो. वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू असताना मग यंदा हे निर्बंध का, असा प्रश्नही अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला गेला .
विसर्जन मिरवणूक सुरू होताना पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे प्रमुख नेते उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आलेल्या माजी पदाधिकाऱ्यांना मात्र पोलिसांनी अडवून धरले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
महापालिकेचे सहायक आयुक्त, उपायुक्त, नगर सचिव यांसह अन्य अधिकारी यांनाही पोलिसांकडून अडविण्यात आले. महापालिकेची ओळखपत्रे दाखवूनदेखील पोलीस सहकार्य करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप केला. त्यानंतर या अधिकाऱ्यांना आणि माजी पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला.