पिंपरी- चिंचवड : कल्याणी देशपांडे च्या गांजा विक्री रॅकेट चा पर्दाफाश पिंपरी- चिंचवड च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे. गुन्ह्यात कल्याणी देशपांडेचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे, अभिषेक विकास रानवडे आणि पुतणी, ऐश्वर्या अभिषेक रानवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ११ लाखांचा २१ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी देशपांडे ही नुकतीच पिटासह मोका अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाई ची शिक्षा भोगून आलेली आहे. परंतु, कल्याणी देशपांडेच गांजा विक्री च रॅकेट सक्रिय होत. याबाबत पिंपरी- चिंचवड पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड यांचं पथक बावधन च्या सुस रोडवर गस्त घालत होत. गोपनीय माहितीच्या आधारे पाषाण सुस रोडवरील कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे च्या कल्याणी कलेक्शन दुकानामध्ये आणि राहत्या घरामध्ये काही साथीदारांसह गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून घरात आणि दुकानात छापा टाकून तिघांना बेड्या ठोकल्या.

आरोपीकडून २१ किलो गांजा देखील जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कल्याणी देशपांडे फरार आहे. कल्याणी देशपांडेवर कोथरूड, डेक्कन, चतुर्श्रुंगी, हवेली पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल आहेत. अभिषेक रानवडे याच्यावर फरासखाना, विश्रामबाग आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पाटील, विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, गणेश करपे, किशोर परदेशी, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, कपिलेश इगवे,चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने केली आहे.