लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : वाकड येथे मोटार चालकाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने पैसे घेऊन पलायन केलेल्या चोरट्याला वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना मंगळवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली.

अरबाज उर्फ लाला इरफान शेख ( वय २३, रा.कोंढवा बुद्रुक, पुणे) याला पाठलाग करून पकडले. तर, त्याचा साथीदार राजू उर्फ सत्यम वीरबहादूर सिंग (वय २४, रा. घोरपडी पेठ, पुणे) याचा शोध घेऊन अवघ्या काही तासात अटक करण्यात आली.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुरेश महादेव जाधव (वय ३४, रा. काळेवाडी) हे वाकड पोलीस ठाण्यात आले. ते वाकड येथे प्रवासी घेण्यासाठी थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून ३१०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांनी जाधव यांच्या मोटारीमधून आरोपींचा शोध सुरु केला. दत्त मंदिररोड येथे आरोपी दिसले.

पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. काळा खडक येथे आल्यानंतर आरोपींच्या दुचाकीला मोटार आडवी लावून त्यांना थांबवले. त्यानंतर देखील आरोपी पळून जात असताना इम्रान सय्यद यांनी पाठलाग करून अरबाजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी आणि कोयता जप्त केला. त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. मात्र अवघ्या काही तासात त्याला देखील वाकड पोलिसांनी अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांचा सत्कार केला. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीता गायकवाड यावेळी उपस्थित होते.