पुणे : कोथरूडमधील गोळीबार प्रकरण, नाना पेठेतील टोळीयुद्धातून भरदिवसा झालेले खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टोळ्यांचे म्होरके, साथीदारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोथरुडमधील नीलेश घायवळ, गजानन मारणे, बंडू आंदेकर, टिपू पठाण या टोळ्यांना होणारी आर्थिक रसद तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या टोळ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आता पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार असून, प्राप्तीकर विभागाला याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेतील टोळीयुद्धातून आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून आंदेकर टोळीने खून केला. कोथरूड परिसरात घायवळ टोळीतील सराइतांनी एकावर गाेळीबार केला. शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा कारवायांना चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्तालयात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंड टोळ्यांचा बिमोड करण्याचे आदेश दिले. ‘गुंड टोळ्यांचे म्होरके, साषीदारांवर कठोर कारवाई करा. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करा. गुंडगिरी, दहशतीच्या बळावर जमविलेले बेकायदा मालमत्तेची माहिती संकलित करावी. ही माहिती प्राप्तीकर विभागाला पाठवावी’, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
या आदेशानुसार आता नीलेश घायवळ, गजानन मारणे, बंडू आंदेकर, टिपू पठाण या गुन्हेगारांवर पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यांच्या माल्रमत्तांची चौकशी केली जाणार आहे. संबंधित माहिती प्राप्तीकर विभागाला दिली जाणार आहे. त्यामुळे या गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, नीलेश घायवळ टोळीचे आर्थिक व्यवहार अमोल लाखे सांभाळत असल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर त्याला नुकतीच अटक करण्यात आली. एका पवनचक्की प्रकल्पासाठी लाखेच्या कंपनीला दिलेल्या कंत्राटांमागे घायवळने दबाव टाकल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे खंडणी विरोधी पथकाकडून लाखेच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती प्राप्तीकर विभागासह अन्य यंत्रणांना देण्यात येणार आहे.
समाजमाध्यमातील गुंडगिरीला चाप
समाजमाध्यमात गुंड टोळ्यांचे म्होरके, साथीदार चित्रफीत प्रसारित करतात. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दहशत माजविणारी चित्रफीत प्रसारित करणाऱ्या सराइतांची झाडाझडती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
