पुणे : शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात परराज्य, परगावाहून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, कोंढवा भागातील तीन मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या होत्या. शाळेत जायची इच्छा असूनही आई मुलींना भीक मागण्यास प्रवृत्त करत हाेती. पुणे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या ‘दामिनी पथका’तील महिला पोलीस कर्मचारी अयोध्या चेचर यांच्या तत्परतेमुले मुलींना पुन्हा शिक्षणाची वाट सापडली.
शाळकरी मुली, महाविद्यालयीन युवती आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. मुलींची छेड काढण्याचे प्रकार रोखणे, तसेच युवती, महिलांना त्वरीत मदत मिळवून देण्याचे काम या पथकाकडून केले जाते. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालण्याची जबाबदारी या पथकाकडे सोपविण्यात आली आहे. शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांशी संवाद साधून मुलींना जाणविणाऱ्या अडचणी या पथकातील महिला पोलीस कर्मचारी करतात. शाळांच्या बाहेर थांबणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध कारवाई केली जाते.
काही दिवसांपूर्वी कोंढवा भागातील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोंढवा पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील अयोध्या चेचर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या शाळेत शिकणारी एक हुशार विद्यार्थीनी अचानक अनुपस्थित राहू लागली होती. पोलीस कर्मचारी चेचर शाळेत गेल्या. त्यांनी शिक्षकांची चौकशी केली. तेव्हा मुलगी घाबरलेली आहे. तिला काही तरी अडचण जाणवले, असे शिक्षकांनी चेचर यांना सांगितले.
त्यानंतर चेचर शाळेच्या मुख्याध्यापकांसह थेट मुलींच्या घरी पोहोचल्या. घराला बाहेरून कुलूप होते. चेचर यांनी दरवाज्याबाहेर थांबून हाक मारली. तेेव्हा घरात शाळकरी मुलगी आणि तिच्या दोन बहिणी असल्याचे लक्षात आले. चेचर यांनी तिघींशी संवाद साधला. तेव्हा मुली रडू लागल्या. मुलींची चौकशी करण्यात आली. तेव्हा ‘आई मुलींना दररोज भीक मागायला नेत होती. आम्हाला शाळेत जायचे आहे’, असे मुलींनी त्यांना सांगितले. शाळेत जायची मुलींची धडपड पाहून मुख्याध्यापकांसह पोलीस कर्मचारी चेचर हेलावल्या. त्यानंतर मुलींच्या आईवर त्यांनी लक्ष ठेवले. सर्व माहिती घेऊन मुलींच्या आईला त्यांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. मुलींच्या आईला समज देऊन त्यांना शाळेत पाठविण्यास सांगितले. मुलींना शाळेत न पाठविल्यास कायदेशीर कारवाई करु, अशी समज पोलिसांनी आईला दिली.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेच्या निरीक्षक वर्षा देशमुख आणि दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी अयोध्या चेचर यांच्या प्रयत्नांमुळे मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत.
‘बेटी बचाव, बेटी पढाओ’, अशी घोषणा दिली जाते. आजही समाजातील अनेक मुली परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. पुण्यासारख्या शहरात मुली शिक्षणापासनू वंचित असल्याचे समजल्यानंतर आपण त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, याची जाणीव झाली. थाेडे प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आले. आता मुली शाळेत जात आहेत. याचा खूप आनंद वाटतो. – अयोध्या चेचर, पोलीस कर्मचारी, दामिनी पथक, कोंढवा पोलीस ठाणे.