पुणे : पुणे शहरातील कोंढवा भागातील एका तरुणीवर दोन दिवसापूर्वी बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी विविध भागात पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्या सर्व घडामोडी दरम्यान गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौर्यावर असून त्यांचे चार कार्यक्रम आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह जाण्याच्या मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तर अनेक ठिकाणी वाहतूक देखील वळवली आहे. यामुळे पुणेकर नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसल्याचे पाहण्यास मिळत आहे.
तर दोन दिवसापूर्वी कोंढवा भागातील तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली.त्याच भागात अमित शाह यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली अमित शाह यांचा ताफा येण्यापूर्वी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात येत होता.त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी साईनाथ बाबर म्हणाले, पुणे शहर आणि राज्यभरातील लहान मुली, तरुणी, महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे. त्या घटना रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. आता दोन दिवसापूर्वी याच कोंढवा भागात एका तरुणीवर घरात घुसून बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीचा शोध अद्याप देखील लागत नाही. तर दुसर्या बाजूला आज याच भागात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कार्यक्रमासाठी होत आहे. या घटनेकडे त्यांनी गांभिर्याने बघावे, तसेच अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी आम्ही काळे झेंडे दाखवून आंदोलन करीत आहोत,मात्र आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमचा कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही आंदोलन करणारच असा इशारा देखील त्यांनी दिला.