दत्ता जाधव

पुणे : सांगोला एके काळचा बारमाही दुष्काळी तालुका पण, या तालुक्याला डाळिंब नावाचे ‘भगवे’ सोने गवसले अन् ओसाड माळराने हिरवीगार झाली. माळरानांवर, डोंगर-कपाऱ्यात टुमदार बंगले, दारात चारचाकी गाडी, अर्धा एकरात पसलेले शेततळे आणि पंधरा-वीस एकरावर बहलेली डाळिंबाची देखणी बाग, असे चित्र गेल्या दहा वर्षांत तालुक्यात तयार झाले होते. पण, आता या सुखद चित्राला ग्रहण लागले आहे. सोने पिकविणाऱ्या या डाळिंबाच्या बागा पीकावरील रोगांमुळे उद्ध्वस्त होत आहेत. सांगोला पुन्हा ओसाड होतोय की काय, अशी भीती वाटू लागली आहे.

कोरडे हवामान, कमी पाऊस आणि माळरानाची मुरमाड जमीन, अशा अनुकूल परिस्थिती मिळाल्यामुळे सांगोला तालुक्यात सुमारे २० हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा बहरल्या होत्या. काही वर्षांपूर्वी तेल्या रोगामुळे बागांना फटका बसला पण, त्यातून शेतकरी सावरले.  गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाला. सरासरी वार्षिक ३०० मिलीमीटर पाऊस पडत असताना ८०० मिलीमीटपर्यंत पाऊस झाला. हवामान कोरडे राहिले नाही. त्यामुळे डाळिंबाच्या झाडाच्या खोडातून झाडात शिरणाऱ्या खोड किडीचा (भुंगेरा) प्रादुर्भाव वाढला. या खोड किडीमुळे पूर्ण झाडच जळून जाते. त्यामुळे कसदार जमिनीतील बागा मागील वर्षीच उद्ध्वस्त झाल्या, यंदा माळरानावरील बागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ८० टक्के बागा काढून टाकण्यात आल्या आहेत.

खोड किडीचा प्रादुर्भाव झालेल्या जमिनीत पुढील दोन वर्ष डाळिंबाची लागवड करता येत नाही. लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षी फळ येते. एका हेक्टरवरील बागेचा दोन वर्षांचा खर्च सुमारे सात लाखांवर जातो. त्यामुळे शेतकरी नव्याने डाळिंब लागवड टाळत आहेत. आता आंबा, सीताफळ, पेरू, चिंच आणि पाणी असलेल्या ठिकाणी केळीची लागवड होत आहे.

जगण्याचं गणित बिघडलं..

इतिहास विषयात एमए, बीएड केलेले अजनाळे (ता. सांगोला) येथील दत्तात्रय येलपले नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळाले. त्यांचा भाऊ सहा-सात एकर बाग करीत होता, त्यांनी शेतीच्या औषधांचे दुकान सुरू केले होते. पण, आता बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे शेती आणि व्यवसाय अडचणीत आला आहे. आमच्या जगण्याचं गणितचं बिघडलंय, या संकटातून बाहेर पडण्यासाठी कृषी विभाग आणि सोलापूरच्या डाळिंब संशोधन केंद्राचा काहीच उपयोग झाला नाही, असेही ते म्हणाले.

झाले काय?

सांगोल्यातून किसान रेल्वेद्वारे डाळिंब देशभरात जात होती. शेतकरी थेट बांगलादेशात ५०-६० हजार टन डाळिंब निर्यात करीत होते. युरोपातही सुमारे १५ हजार टन निर्यात होत होती. पण ही सर्व कोटय़वधींची उलाढाल आता ठप्प झाली आहे.

फटका किती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१मध्ये सोलापूर जिल्ह्याची डाळिंबाची आर्थिक उलाढाल ३००० कोटींवर होती, यंदा फक्त ८०० कोटींवर आली आहे. पुढील वर्षी फक्त २०० कोटींवर राहील, अशी माहिती डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी दिली.