पुणे – पुणे वेधशाळेने बुधवारी संध्याकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार तासात पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाबरोबरच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.  

पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, तसेच पाऊस सुरु झाल्यास झाडाखाली आसरा घेऊ नये, असेही वेधशाळेने स्पष्ट केले आहे. पुणे वेधशाळेचे डॅा. अनुपम कश्यपी यांनी हा अंदाज प्रसिद्ध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.