पुणे : वीज तोडण्याची भिती घालून सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील एका नागरिकाला तीन लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांनी सायबर चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ५१ वर्षीय व्यक्तीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. थकित वीज बिल न भरल्यास वीज तोडण्याची बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. काही वेळात वीज कंपनीतील कर्मचारी येणार असून वीज मीटर काढून नेणार आहेत, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली होती.
हेही वाचा >>> पुणे : महापालिका भवन परिसरात मोबाइल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात ; १८ मोबाइल संच जप्त
चोरट्याने पाठविलेल्या संदेशातील मोबाइल क्रमांकावर तक्रारदाराने संपर्क साधला. चोरट्याने त्यांना एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. बँक खाते तसेच डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने तीन लाख रुपये लांबविले. खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे तपास करत आहेत.
सायबर पोलिसांचे आवाहन
गेल्या काही महिन्यांपासून वीज तोडण्याची धमकी देऊन सायबर चोरट्यांकडून नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. महावितरणकडून अधिकृत संदेश पाठविण्यात येतो. चोरटे समाजमाध्यमाचा वापर करुन संदेश पाठवितात. संदेशातील मोबाइल क्रमांक चोरट्यांचा असतो. चोरटे एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात. त्यानंतर बँक खात्यातून पैसे लांबविले जातात. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.