पुणे : ‘माझ्यावरील हल्ला सरकारपुरस्कृत होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या हल्ल्याबाबत विधिमंडळाला खोटी माहिती दिली,’ असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी बुधवारी केला. ‘केवळ निषेध करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला नाही, तर तो पूर्वनियोजित कट होता. भाजपने अद्यापही हल्लेखोर दीपक काटे याची हकालपट्टी केलेली नाही. त्यामुळे सरकारच्या संमतीने हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट होते,’ अशी टीकाही त्यांनी केली.

गायकवाड यांच्यावर रविवारी (१३ जुलै) अक्कलकोट येथे शिवधर्म प्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या प्रकरणातील आरोपी दीपक काटे भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. ते म्हणाले, ‘बावनकुळे यांनी काटेला राजकीय पाठबळ दिले.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी तुझ्या पाठीशी आहोत,’ असे बावनकुळे यांनी जाहीर सभेत सांगितल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार बावनकुळे आहेत. माझ्यावरील हल्ला सरकारपुरस्कृत होता. हल्ल्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांनी विधिमंडळाला खोटी माहिती दिली.’

‘या प्रकरणात ‘मकोका’अंतर्गत कारवाई अपेक्षित होती. मात्र, अक्कलकोट येथील तपासाधिकारी हे बावनकुळे यांचे नातेवाईक आहेत. काटेला जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. काटे याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, अशा गुन्हेगाराला भाजयुमोचे सरचिटणीसपद देण्यात आले,’ असे गायकवाड म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जशास तसे उत्तर’

‘आम्ही लोकशाही मूल्ये मानतो. तरुणांना दिशा देण्याचे काम करतो. सामाजिक तेढ कमी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड नेहमीच सक्रिय असते. ही आमची चूक आहे का? माझ्यावर झालेल्या सरकारपुरस्कृत हल्ल्याचा निषेध करणार नाही. मात्र, ब्रिगेड जशास तसे उत्तर देणार आहे,’ असे प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केले.