पुणे : देशातील वाहन उद्योगात मोठे बदल घडत आहेत. नवतंत्रज्ञानाचा वाढता स्वीकार आणि ग्राहकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे अतिशय वेगाने हे बदल घडत आहेत. वाहन उद्योगातील भविष्यवेधी नवतंत्रज्ञानाचे सादरीकरण ईव्ही अँड ऑटोटेक फोरम परिषदेत करण्यात आले. यावेळी तुमच्याच आवाजात संवाद साधणाऱ्या मोटारीपासून घराशी थेट कनेक्ट होणाऱ्या नवतंत्रज्ञानाची मांडणीही करण्यात आली.
कनेक्ट वर्ल्डवाईड बिझनेस मीडियाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत देशातील वाहन उद्योगातील तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. वाहनातील संपर्क यंत्रणा, उच्च संगणकीय क्षमता असलेली यंत्रणा, चालक सहाय्य अथवा स्वयंचलित वाहन यंत्रणा, नवतंत्रज्ञानाच्या स्वीकारासोबत वाढलेल्या सुरक्षात्मक उपाययोजना, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्रीकरण, ई-वाहन चार्जिंग तंत्रआन, एडास यासारख्या गोष्टींवर परिषदेत चर्चा करण्यात आली.
यावेळी जिओचे इंटरनेट ऑफ थिंग्ज विभागाचे उपाध्यक्ष मोहन राजू म्हणाले की, आता मोटारी केवळ इंटरनेटशी जोडण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्यात क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापरही केला जात आहे. घर, कार्यालयातूनही मोटारींशी संपर्क करता येतो. तुम्ही घरात बसून मोटारीचे चार्जिंग आणि इतर गोष्टी दूरचित्रवाणी संचावर पाहू शकता. भारतीय भाषांतून आता तुम्ही मोटारींशी संवाद साधू शकता. एवढेच नव्हे तर नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञेमुळे मोटारी तुमच्याच आवाजात तुमच्याशी संवाद साधतात. नवतंत्रज्ञानामुळे मोटारींच्या रचनेपासून त्यांच्या निर्मितीपर्यंत अनेक बदल घडत आहेत. यामागे ग्राहकांकडून वाढणारी मागणीही कारणीभूत आहे. त्यामुळे वाहननिर्मिती कंपन्या नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्यांचा प्रत्यक्ष वापर मोटारींमध्ये करीत आहेत.
यावेळी मीडियाटेकचे उपसंचालक स्टीव्हन ली म्हणाले की, भारतात कनेक्टेड म्हणजेच इंटरनेटसह आधुनिक संपर्क यंत्रणा असलेल्या मोटारींची मागणी वाढत आहे. तुमच्या मोबाईलशी या मोटारी जोडलेल्या असतात आणि त्यावरूनच त्यांना नियंत्रितही करता येते. भारतात कनेक्टेड मोटारींची बाजारपेठेची २०२५ ते २०३० या कालावधीत वार्षिक वाढ १८ टक्के राहील. भारतात जागतिक पातळीवरील वाहननिर्मिती कंपन्यांचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे या कंपन्यांकडून सादर केले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान देशातील वाहननिर्मिती कंपन्यांही ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोटारी या ५जी नेटवर्कशी जोडल्या जात असून, त्यांच्या संपर्क यंत्रणेत यामुळे अमूलाग्र बदल होणार आहे. कृत्रिम प्रज्ञेमुळे (एआय) भविष्यात मोटारी चालविण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.