“पंतप्रधान मोदी स्वत:ला गांधीवादी म्हणत असले, तरी ते मूळ सावरकर…”; शरद पोंक्षेंचं मोठं विधान

स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही आणि तो कधी मावळणारही नाही, असे मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षांहून अधिक काळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही आणि तो कधी मावळणारही नाही, असे मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. अहिंसेने रक्षण करता येत नाही. त्यासाठी शस्त्रच हाती घ्यावे लागते, असेही पोंक्षे म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर जयंती समितीतर्फे पुण्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, विवेक जोशी, प्रकाशक पार्थ बावस्कर, समितीचे सूर्यकांत पाठक, विद्याधर नारगोळकर, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, श्रीकांत जोशी यावेळी उपस्थित होते. शब्दांमृत प्रकाशनतर्फे शरद पोंक्षे यांच्या ‘दुसरं वादळ’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.

पोंक्षे म्हणाले, सावकरांना टिळकांची कॉंग्रेस मान्य होती. गांधींची नव्हती. हिंदी राष्ट्रवाद, मुस्लिमांचे पराकोटीचे लांगुलचालन यामुळे मी कॉंग्रेसमध्ये कधीच येऊ शकत नाही, हे सावकरांनी स्पष्ट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गांधीवादी म्हणत असले, तरी ते मूळ सावरकरवादी आहेत. राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका स्वीकारणे त्यांना जमते. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना त्यांनी सावरकरांचा गौरव केला होता. हा इतिहास इंदिरा गांधींच्या नातवाला माहिती नाही.

पोंक्षे पुढे म्हणाले की, अंदमानातून सुटल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजसुधारक म्हणून मोठे कार्य उभारले. त्यांनी सर्व जातींमधील मुलांच्या मुंजी लावल्या. आंतरजातीय विवाह घडवून आणले. सहभोजने घातली. मंदिरे खुली केली. सावरकरांच्या विरोधकांवर जातीद्वेष, जातीभेदाचेच संस्कार होते. आमच्यावर सावरकरांचे संस्कार आहेत. राम जिंकणार, रावण हरणार, यावर माझा ठाम विश्वास आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prime minister narendra modi calls himself gandhian but he is originally savarkar said sharad ponkshe pune print news rmm

Next Story
धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
फोटो गॅलरी