पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे उद्योगांची कोंडी निर्माण झाली होती. ही कोंडी सोडविण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अखेर पावले उचलली आहेत. चाकण, हिंजवडी आयटी पार्क, पिंपरी-चिंचवड, तळेगाव औद्योगिक क्षेत्रांतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याची घोषणा उद्योगमंत्र्यांनी गुरुवारी केली.

पुणे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या देशात आघाडीवर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या समस्यांचे ग्रहण जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला लागले आहे. आश्वासने देण्यापलीकडे काहीच कार्यवाही होत नसल्याने उद्योगांकडून सातत्याने सरकारकडे याबाबत जाब विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध उद्योग संघटनांबरोबर चाकणमध्ये गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य अभियंता नितीन वानखेडे, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.

यावेळी सामंत यांनी उपस्थित उद्योग प्रतिनिधींकडून औद्योगिक क्षेत्रांमधील वीज, पाणी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची स्थिती आदी समस्या जाणून घेतल्या. चाकण येथे कामगार रुग्णालय (ईएसआयसी) उभारण्यासाठी जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यावर उद्योगमंत्री सामंत यांनी बैठक संपेपर्यंत कार्यवाही करून जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. बैठक संपताच विभागाने आवश्यक ती कार्यवाही करून उद्योगमंत्री यांच्या हस्ते या जागेच्या हस्तांतरणाचे पत्र उद्योग संघटनेकडे सुपूर्त करण्यात आले.

बैठकीत झालेले निर्णय

वीज पुरवठा

  • पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या वीज समस्येवर तातडीने तोडगा काढणार.
  • पुढील वर्षभरात वीजप्रश्न पूर्णपणे मिटवण्यासाठी ४५० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी.
  • नव्या ६५० कोटी रुपये खर्चाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू.
  • महावितरणच्या माध्यमातून चाकण, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, हिंजवडी परिसरात १ हजार कोटींची कामे

पायाभूत सुविधा विकास

  • औद्योगिक क्षेत्रातील पथदिवे आणि रस्त्यांच्या कामांना मंजुरी.
  • पुढील वर्षभरात चाकण औद्योगिक क्षेत्रात १०० कोटी रुपयांची कामे.
  • औद्योगिक क्षेत्रात महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारणार.
  • घनकचरा प्रकल्प लवकरच सुरू करणार.

वाहतूक समस्या

  • हिंजवडीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरणासाठी ७६२ कोटी रुपये.
  • नाशिक फाटा ते खेड जंक्शन व तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यांचे काम पुढील वर्षाच्या सुरुवातीला.
  • पोलीस विभागाच्या मागणीनुसार ३ क्रेन कायमस्वरुपी उपलब्ध.
  • चाकणमध्ये दोन ते तीन नवीन ट्रक टर्मिनल उभारण्यासाठी सर्वेक्षण.

सुरक्षा

  • औद्योगिक क्षेत्रात ३५० ते ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार.
  • चाकण औद्योगिक क्षेत्रात नवीन पोलीस ठाणे उभारणार.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये काम करणाऱ्या उद्योजकांना एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियमाप्रमाणे वेगळा विभाग अथवा क्लस्टर करून देण्याचा विचार सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

  • उदय सामंत, उद्योगमंत्री

‘पीएमआरडीए’ आयुक्तांवर मंत्र्यांचा संताप

या बैठकीला पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे हे उपस्थित नसल्याने उद्योगमंत्री उदय सामंत संतापले. ते म्हणाले, ‘उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. परंतु, पीएमआरडीए आयुक्तांना या बैठकीला यावेसे वाटले नाही. दुसऱ्या बैठका महत्त्वाच्या वाटतात आणि ही बैठक महत्त्वाची वाटत नाही. ‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रातील प्रश्नांबाबतच्या बैठकीला आयुक्त हजर नसतील, तर निर्णय कोण घेणार? निर्णय घेण्याचा अधिकार असेल, अशा अधिकाऱ्यांनीच बैठकीला उपस्थित राहावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.