जलरंग, तैलरंग, कडधान्ये, कोलाज, रांगोळी अशा विविध प्रकारांचा वापर करून लोकमान्य टिळकांची ७५ व्यक्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. या ७५ चित्रांपैकी साठ चित्रे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबागचे पर्यवेक्षक आणि चित्रकला शिक्षक सुरेश वरगंटीवार यांनी ही चौदा महिने, पाचशे तास काम करून साकारली असून, उर्वरित चित्रे अन्य चित्रकारांची आहेत.

स्वातंत्र्य चळवळीचे अध्वर्यू आणि डीईएसचे संस्थापक असणाऱ्या लोकमान्यांना अभिवादन करण्यासाठी, भारतीय भारतीय स्वातंत्र्याच्या आणि रमणबागेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा अभिनव उपक्रम करण्यात आला. लोकमान्यांचेे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते ही व्यक्तिचित्रे रमणबागेचे मुख्याध्यापक सुनील शिवले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. शाला समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, पर्यवेक्षक दिलीप रावडे, सामाजिक कार्यकर्ते पराग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तैलरंग, जलरंग, पोस्टर कलर, पेन्सिल शेडिंग, कॅनव्हास पेंटिंग, पुठ्ठा, वर्तमानपत्रे, विविध प्रकारचे कागद, कोलाज, अॅल्युमिनियम, शाडू माती, फायबर, रंगीत सुतळी, रंगीत कागद, निब पेंटिंग, मेहंदी पेंटिंग, एम्बॉस, वाळलेले गवत, झाडांची पाने, कडधान्ये, पझल, रांगोळी, मोती, मणी आदी माध्यमांचा आणि तंत्रांचा वापर करून चित्रनिर्मिती करण्यात आली. तसेच शेंगांची टरफले, केसरी वर्तमानपत्राचे कोलाज, अक्षर गणेश, पझल, खादीचे कापड, कडधान्ये, झाडांची पाने आदी माध्यमांच्या सहाय्याने लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील विविध प्रसंगही साकारण्यात आले. त्यात लोकमान्यांचे बालपण, केसरीची स्थापना, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, स्वदेशी, आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व आदींचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरगंटीवार म्हणाले, की ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या चित्रावरून ही चित्रे साकारण्यात आली. त्यासाठी बहुळकर यांच्याकडून रीतसर परवानगीही घेतली. ७५ चित्रांपैकी साठ चित्रे मी केली. तर उर्वरित पंधरा चित्रांमध्ये विजय दीक्षित, अरूण सूर्यवंशी, त्र्यंबक पोखरकर, अनिल बळवंत, अक्षय शहापूरकर, लीना वरगंटीवार, शिशुुपाल पानके, मिलिंद शिंपी, सतीश घाटपांडे, विद्या जितुरे, राधिका मालेकर, अनंत खैरनार, मुग्धा गोहाड, महेंद्र मोरे यांच्या चित्रांचा समावेश आहे.