पुणे : सामाजिक दबाव, कौटुंबिक समस्यांमुळे भरडली जाऊन भरकटणारी मुले आणि त्यातून स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न, अशा कारणांमुळे ‘टीनएजर’ मुले विघातक मार्गाला लागत असल्याचे चित्र आहे. या मुलांना एखादा मानसिक आजार आहे का, याचा शोध घेऊन समुपदेशन आणि उपचार आणि गुन्हेगारी स्वभावाच्या मुलांबाबत समुपदेशन आणि उपचारांच्या बरोबरीने पोलीस, कायदा यांची मदत यांचा सकारात्मक परिणाम दिसतो, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निकेत कासार यांनी व्यक्त केले.

शहरातील ‘कोयता गँग’ च्या वाढत्या दहशतीच्या निमित्ताने अशा ‘गँग’मध्ये आणि गाड्या जाळणे, गाड्या पळवणे, तोडफोड करणे अशा पद्धतीने सक्रिय असलेल्या १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या मानसिकतेबाबत आढावा घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने डॉ. निकेत कासार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी डॉ. कासार यांनी १२-१८ वयोगटातील मुले आणि त्यांच्यामध्ये दिसणाऱ्या मनोविकारांबाबत माहिती दिली.

हेही वाचा – सलग दुसऱ्या वर्षी पुण्यात सर्वाधिक लाचखोरी; नाशिक दुसऱ्या तर उपराजधानी पाचव्या क्रमांकावर

डॉ. कासार म्हणाले, या वयातील मुलांच्या मनातील तीव्र असंतोषाची अनेक कारणे आहेत. सामाजिक दबाव, स्वत:ची ओळख निर्माण करण्याची धडपड आणि कौटुंबिक समस्या, अशा अनेक कारणांमुळे या मुलांच्या मनातील स्वयंप्रतिमा अत्यंत वाईट असते. मोठे होताना मोठ्या वयाच्या मुलांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्यावर स्वत:ची छाप पाडण्यासाठी लहान मोठी कृत्य करणे, त्या दुर्लक्षित राहिल्यावर अशा कृत्यांच्या कक्षा रुंदावणे अशा गोष्टी घडतात. इंपल्सिव बिहेविअर, अपोझिशनल डिफाईन्ड डिसऑर्डर, अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे अनेक प्रकार या वयातील मुलांमध्ये दिसून येतात. आजारानुरूप आवश्यक तेवढे औषधोपचार आणि त्याबरोबरीने समुपदेशन असा दुहेरी पर्याय अनेक मुलांवर सकारात्मक परिणाम घडवून आणतो, असेही डॉ. कासार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – विश्लेषण : पुण्यातील कोयता गँगची दहशत कोण मोडणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही मुले काय करतात?

बनावट किल्लीचा वापर करून इमारतींच्या वाहनतळांमधील दुचाकी पळवणे, इंधन संपेपर्यंत त्या वापरून सोडून देणे हे या वयातील मुलांच्या वागण्यात सर्रास दिसून येते. तोडफोड, गाड्यांच्या काचा फोडणे, मारामारी करणे हेही या वयोगटातील मुलांची लक्षणे आहेत. काही प्रकारच्या मानसिक आजारांमध्ये काही तरी जाळण्याची तीव्र इच्छा होणे हे लक्षणही दिसते. अशी मुले दुचाकी किंवा चारचाकी किंवा मनात येईल ते जाळून टाकतात. आग लावल्यानंतर त्यांची चिडचिड, अस्वस्थपणा दूर होतो. शास्त्रोक्त निदान आणि उपचार यांच्या मदतीने यांपैकी बहुतांश मुले पूर्वपदावर येतात.