पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील पादचारी फुलाच्या छतावर गुरूवारी एक मनोरुग्ण चढला. प्रवाशांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. तो तेथून खाली उतरण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांनी त्याला पकडून छतावरून खाली आणले. त्याला त्याच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या छतावर एका व्यक्ती अचानक चढून बसला. हे पाहताच प्रवाशांनी आरडाओरड करीत त्याला खाली उतरण्यास सांगितले. तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पादचारी पुलाखालून रेल्वे गाड्या जात असलेल्या तिथून विजेच्या ताऱ्या गेलेल्या आहेत. छतावरून हा व्यक्ती खाली पडला असता तर दुर्घटना घडण्याची भीती होती. रेल्वे स्थानकातील हा गोंधळ पाहून रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांचे पथक तिथे दाखल झाले.

आणखी वाचा-Pune Accident Case : अल्पवयीनाच्या आजोबाची गुन्हे शाखेकडून चौकशी

पोलिसांनी छतावर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने खाली उतरण्यास नकार दिला. अखेर काही पोलीस कर्मचारी छतावर चढले आणि त्यांनी त्याला पकडून खाली उतरवले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करून नातेवाईकांचा दूरध्वनी क्रमांक घेतला. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईक तिथे तातडीने दाखल झाले. त्यावेळी त्यांनी तो मनोरुग्ण असून, घरी भांडण झाल्याने निघून गेला होता, अशी माहिती दिली. अखेर पोलिसांनी त्याला नातेवाईकांच्या हवाली केले, अशी माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिली.